शक्तीने नव्हे तर युक्तीने व्यवसाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:55 AM2017-11-10T00:55:13+5:302017-11-10T00:55:20+5:30

पैसा आला की ग्राहकांशी उर्मटपणे वागणे-बोलणे चुकीने असून ग्राहक हाच आपला देव आहे, असे मानले पाहिजे. कारण, ग्राहकानेच तुम्हाला या स्थानापर्यंत नेले आहे

Do business by trick, not by power | शक्तीने नव्हे तर युक्तीने व्यवसाय करा

शक्तीने नव्हे तर युक्तीने व्यवसाय करा

Next

ठाणे : पैसा आला की ग्राहकांशी उर्मटपणे वागणे-बोलणे चुकीने असून ग्राहक हाच आपला देव आहे, असे मानले पाहिजे. कारण, ग्राहकानेच तुम्हाला या स्थानापर्यंत नेले आहे, हे विसरू नका, असे सांगतानाच मसाला किंग धनंजय दातार यांनी व्यवसाय हा शक्तीने नव्हे, तर युक्तीने करावा, असा कानमंत्र दिला. बुद्धीचा योग्य वापर, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वास ज्याच्या अंगी आहे, त्याची व्यवसायात प्रगती झालीच असे समजा, असेही त्यांनी सांगितले.
ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे मराठी बिझनेस एक्स्चेंजच्या वतीने मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांकरिता सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दोनदिवसीय उद्योजकीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दातार यांच्या हस्ते झाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, अ‍ॅडगुरू भरत दाभोळकर, एलआयसीचे पुनीत कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी दातार यांनी बिझेनस कसा करावा, कसा वाढवावा, याबद्दल विविध टिप्स दिल्या. एखादा व्यावसायिक माझा एक हजार कोटींचा टर्न ओव्हर आहे, असे जेव्हा सांगतो, तेव्हा त्याला फायदा किती मिळतो, हेही पाहणे गरजेचे आहे, असे नमूद करून दातार म्हणाले की, त्यापेक्षा १०० कोटींचा टर्न ओव्हर करून जास्त फायदा मिळवणाºयाला मी खरा श्रीमंत म्हणेन. व्यवसायातील यशस्वितेचा निकष टर्न ओव्हर नसून नफा आहे, असे ते म्हणाले.
ठाण्यातही सुरुवातीला घरोघरी जाऊन फिनाइल विक्रीचे कामही केले. दुबईत जाण्याचे स्वप्न पहिल्यापासून होते. वडील आणि मी दुबईत जाऊन व्यवसाय केला. परंतु, आमचे मोठे नुकसान झाले. पुन्हा भारतात येऊन आईचे दागिने विकले, मंगळसूत्रदेखील विकले आणि पुन्हा नव्याने दुबईत व्यवसाय उभा केला. त्या वेळेस नेमके कुवेत-वॉर सुरू झाले होते. त्याचाच फायदा आम्हाला झाला. माझ्याकडील माल चारपट अधिक किमतीने विकला गेला आणि मी आईचे दागिने सोडवले. त्या वेळेस तिच्या डोळ्यांत उभे राहिलेले अश्रू आणि तिने गालावरून फिरवलेला हात, हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता, असे त्यांनी या वेळी सांगितले.
व्यवसाय करायला शिक्षण लागतेच, असे नाही. मला दहावीला गणितात १५० पैकी केवळ २ गुण मिळाले होते. पाच वेळा परीक्षेला बसूनही मी नापास झालो. त्यानंतर, जिद्दीने अभ्यास केला आणि ५७ गुण मिळवले. परंतु, आज करोडोंच्या रकमा मी हाताच्या बोटांवर मोजू शकतो. ज्या वेळेस माझ्याकडे पैसा नव्हता, तेव्हा मला कोणी साध्या पार्टीलादेखील बोलवत नव्हते. एका बर्थ डे पार्टीच्या वेळेस तर मला खुर्चीवरून उठवण्यात आले होते. परंतु, ज्या वेळेस माझ्याकडे पैसा आला, तेव्हा ज्या व्यक्तीने मला खुर्चीवरून उठवले होते, त्याला माझी वेळ घेण्यासाठी दीड तास थांबावे लागले होते, अशी घटना त्यांनी सांगितली.
स्वत: सुपर मार्केट सुरू केले, परंतु त्याचा अभ्यास करण्यासाठी मी दुसºया सुपर मार्केटमध्ये काम केल्याचेही दातार यांनी नमूद केले. आयुष्यात मी खूप पैसा कमावला. परंतु, त्याचा विनियोग केला नाही, तो एन्जॉय केला नाही. मधल्या काळात मला अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास झाला. अखेर, या आजारातून बरे झाल्यावर एक शिकलो की, केवळ पैसा असून उपयोग नाही, तर तो एन्जॉय केला पाहिजे. तुम्हाला तुमच्या कामाचे मार्केटिंग करता आले पाहिजे. ग्राहकांना आकर्षित करायचे झाले, तर आॅफर तर तुम्हाला देणे भागच आहे. एखाद्या वस्तूवर आॅफर देऊन दुसºया वस्तूमधून तुम्हाला तुमचा नफा कमावता आला पाहिजे, असे दातार यांनी सांगितले.
मराठी माणसाला आता कमी लेखून चालणार नाही. तो व्यवसाय करू लागला आहे आणि त्याने गरुडझेप घेतली आहे. त्याला आपल्या प्रॉडक्टचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, नेटवर्किंग करता आले पाहिजे, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाल्यानंतर सव्वादोन तासांत अंतर कापले जाऊ लागल्याने उद्योगांना चालना मिळाली. आता समृद्धी महामार्गामुळे अशाच प्रकारे उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, हा समज आता जुना होत चालला आहे. व्यवसायात नुकसानच होते, ही मराठी उद्योजकांची भीती कमी झाली असल्याचे मत महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केले. एखादा व्यावसायिकाला धंद्यात नुकसान होत असेल, तर अडचणीत सापडलेल्या उद्योजकांकरिता आता चेंबर्सच्या वतीने हेल्प डेस्क तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Do business by trick, not by power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.