ज्युपिटर रुग्णालयातील डाॅक्टरांना 'कोरोना'च्या विळख्यात अडकवायचे आहे का?; मनसेचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 03:14 PM2020-04-10T15:14:28+5:302020-04-10T15:16:33+5:30
राज्य शासनाने कोरोनाग्रस्त रूग्ण खाजगी रूग्णालयात ठेऊ नये असे आदेश दिलेले आहेत.
ठाणे- 'कोरोना'ग्रस्त रुग्ण सर्वसामान्य रुग्णालयात न ठेवता सरकारने जाहीर केलेल्या कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश ठाणे पालिका प्रशासनाने धाब्यावर बसवले आहेत. ठाण्यातील पंचतारांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या ज्युपिटर रुग्णालयाचा कोव्हिड रुग्णालयाच्या यादीत समावेश नसतानाही याठिकाणी कोरोना रुग्ण ठेवल्याने येथील डाॅक्टर व कर्मचार्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या जसलोक व व्होकार्ट रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णामुळे येथील कर्मचारी व डाॅक्टरांदेखील या आजाराची लागण झाल्याने या दोन रुग्णालयांना टाळे ठोकण्याची पाळी मुंबई पालिकेवर आली. हीच वेळ ठाणे पालिका ज्युपिटरवर आणणार का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारला जात आहे.
राज्य शासनाने कोरोनाग्रस्त रूग्ण खाजगी रूग्णालयात ठेऊ नये असे आदेश दिलेले आहेत. ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी सिव्हील व होरायझन प्राईम हे खासगी रुग्णालय अशी दोन राखीव रुग्णालय ठेवण्यात आली आहेत. माञ तरीही सरकारी नियमाला बगल देत ठाणे पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णाला ज्युपिटर रुग्णालयात उपचारार्थ ठेवले आहे. ठाण्यात मल्टिस्पेशलिटी रुग्णालयांची वानवा आहे. त्यात जसलोक, व्होकार्ट तसेच मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयात कोरोना रुग्णांमुळे डाॅक्टर व इतर कर्मचारी बाधित झाल्याची उदाहरणे ताजी असताना ठाणे पालिका प्रशासन नेमकी कशाची वाट पाहत असल्याचा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी विचारला आहे.
आधीच हौस, त्यात पडला पाऊस
ज्युपिटर रुग्णालय कोरोना रुग्णालय जाहीर करा, अशी मागणी सुरवातीपासून जोर धरत होती. माञ सरकारी अनास्थेपोटी पुरेशा सुविधा नसलेले सिव्हिल व मध्यवर्ती रुग्णालय नसलेल्या होरायझन प्राईमची निवड करण्यात आली. तर आता ज्युपिटर कोव्हिड रुग्णालय यादीत नसताना देखील त्याठिकाणी कोरोना रुग्ण ठेवायचा अट्टाहास का, असा प्रश्न संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.