आम्हाला आश्वासन नको... आमची घरे द्या...!
By admin | Published: December 8, 2015 12:19 AM2015-12-08T00:19:32+5:302015-12-08T00:19:32+5:30
‘आम्हाला तुमची आश्वासने नको, आम्हाला आमची घरे द्या...!’, आम्ही मोलमजुरी करून पै-पै साठवून घर घेतले आहे, आता आम्ही कुठे जायचे, असा संतप्त सवाल करीत विरारमधील कारगिलनगर
पारोळ : ‘आम्हाला तुमची आश्वासने नको, आम्हाला आमची घरे द्या...!’, आम्ही मोलमजुरी करून पै-पै साठवून घर घेतले आहे, आता आम्ही कुठे जायचे, असा संतप्त सवाल करीत विरारमधील कारगिलनगर रहिवाशांनी सोमवारी वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यालयावर विराट मोर्चा काढला.
वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तहसीलदार कार्यालयामार्फत महिनाभरापासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी येथील इमारती आणि झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी सकाळी वसई तहसीलदार कार्यालयाकडून घरे तोडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या. यात तुमची बांधकामे अनधिकृत असून ती खाली न केल्यास १० डिसेंबरला ती तोडण्यात येतील, अशी सूचना देण्यात आली. या नोटिसांनंतर कारगिलनगरमधील नागरिक संतप्त झाले. दुपारी ३ च्या सुमारास मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनवेलपाडा रोडवरून निघालेल्या मोर्चामध्ये पुरुषांसोबत महिला तसेच मुलांचा समावेश होता. जोरदार घोषणा देत जोपर्यंत मनपा आयुक्त लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले. या वेळी महिलांनी महानगरपालिकेविरोधात घोषणा दिल्या. आम्ही लोकांच्या घरी मोलमजुरी करून घरासाठी पै-पै गोळा करून घर घेतो आणि तुम्ही १०-१२ वर्षांनी ती अनधिकृत कशी ठरवता, असा सवाल मनपाला तसेच तहसीलदार कार्यालयाला विचारला. या वेळी उपायुक्त किशोर गवस यांनी ही कारवाई व नोटीस मनपाने बजावली नसल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिका कारगिलनगरमधील चाळींवर कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिले. या वेळी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी तहसीलदार कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.