दूध दरवाढीचा तूर्त ग्राहकांवर बोजा नाही!
By admin | Published: June 20, 2017 06:31 AM2017-06-20T06:31:20+5:302017-06-20T06:31:20+5:30
दुधाचे दर तीन रुपयांनी वाढवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असली, तरी या दरवाढीपेक्षा दुप्पट रक्कम ग्राहक आधीच मोजत असल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दुधाचे दर तीन रुपयांनी वाढवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असली, तरी या दरवाढीपेक्षा दुप्पट रक्कम ग्राहक आधीच मोजत असल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या दरवाढीचा फटका सध्या तरी ग्राहकांना बसणार नाही. परंतु, जादा नफा कमवून गल्ला भरणाऱ्या दूध संकलक कंपन्या काही दिवसांतच ही दरवाढ लादण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती दूधविक्रेते व्यक्त करत आहेत.
सोमवारी गायीचे दूध २४ वरून २७ रुपये, तर म्हशीचे दूध ३३ वरून ३६ रुपये दराने विकण्यास राज्य शासनाने कंपन्यांना व दूध फेडरेशनला परवानगी दिली. हा वाढीव दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु, या कंपन्या किंवा दूध फेडरेशनकडून गायीचे दूध ४० ते ४३ रुपये दराने, तर म्हशीचे दूध ५० ते ५४ रुपये लीटरने ग्राहक आधीच घेत आहेत. यामुळे वाढीव किमतीचा फटका सध्या ग्राहकांना बसणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कंपन्या काही दिवसांनी ग्राहकांना वाढीव दराचा फटका देणार असल्याची भीती ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
मुंबई, ठाणे ते पनवेलपर्यंत सुमारे ५५ लाख लीटर दुधाची विक्री रोज होते. ठाणे शहरात सुमारे साडेतीन लाख लीटर दूध विकले जाते. कल्याण, डोंबिवली परिसरांत सुमारे चार लाख लीटर दुधाची विक्री होते. शेतकऱ्यांकडून २४ रुपये लीटरने घेतलेले गायीचे दूध ग्राहकाला ४३ रुपये भावाने विकले जात आहे. म्हणजे, लीटरमागे १६ रुपयांची लूट कंपन्यांकडून आधीच होत आहे. म्हशीचे दूध नव्या वाढीव दरानुसार ३६ रुपये लीटर मिळणार आहे. पण, ग्राहक या दुधासाठी आधीच १८ रुपये जादा देत आहे. ग्राहक आधीच जादा भाव देत असल्यामुळे सध्या त्यांना या वाढीव दराचा फटका बसू दिला जाणार नाही, असा अंदाज आहे.