नगरसेवकपद रद्द का करु नये ? भाजपा गटनेत्याने बजावलेल्या नोटीसला माजी महापौरांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 08:54 PM2018-03-13T20:54:59+5:302018-03-13T20:56:24+5:30
कोणताही पक्षादेश वा सूचना नसल्याने त्याचे पालन केले नाही हा आरोप अमान्य असल्याचे जैन यांनी म्हटले
मीरारोड : मीरा-भार्इंदर भाजपातील आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात दंड थोपटणा-या भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांना महाभेतील दोन ठरावांवर तटस्थ राहिल्याबद्दल पक्ष विरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत थेट नगरसेवकपद रद्द करण्याच्या गटनेत्याने दिलेल्या नोटीसला जैन यांनी उत्तर दिलंय. कोणताही पक्षादेश वा सूचना नसल्याने त्याचे पालन केले नाही हा आरोप अमान्य असल्याचे जैन यांनी म्हटले आहे .
महापौरपदी असल्यापासून स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहतांकडून डावललं गेल्याबद्दल दंड थोपटणा-या माजी महापौर गीता जैन यांनी तर आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवल्याने सद्या जैन विरोधात मेहता व त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यातुनच २० व २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत माजी महापौर गीता जैन ह्या दोन ठरावांसाठी झालेल्या मतदानावर तटस्थ राहिल्या होत्या. मेहतांचे निकटवर्तीय भाजपा गटनेते हसमुख गेहलोत यांनी जैन यांना ४ मार्च रोजी नोटीस काढली. पक्षाच्या सदस्यांनी मांडलेला ठराव व त्या बाजुने सर्व भाजपा नगरसेवकांनी मतदान केले असताना जैन यांनी तटस्थ राहणे पक्षविरोधी असल्याने ८ दिवसात खुलासा करा. अन्यथा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता अधिनियम १९८६ अन्यवये शिस्तभंगाची म्हणजेच नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई केली जाईल बजावले होते.
लोकमतने सर्वात प्रथम हे वृत्त दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान जैन यांनी गटनेत्याच्या नोटीसला उत्तर दिल्याचे सुत्रांकडून कळले असून त्यामध्ये महासभेस उपस्थित राहण्याबद्दल, मतदान कसे करावे वा तसा पक्षादेश काढल्याबद्दल कसलीही प्रसिध्दी नव्हती. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर देखील कसली सूचना दिली नव्हती असे नमुद केले आहे. त्यामुळे पक्षादेशचे पालन केले नाही हा आरोप अमान्य असल्याचे जैन यांनी म्हटले आहे.
काय होते ते ठराव :
प्रारप विकास आराखड्या बद्दल चर्चा विनीमय करुन निर्णय घेण्याचा विषय ऐनवेळी आणताना ठरावात येत्या महासभेत विकास आराखडा सादर करण्याचा तसेच आराखडा फुटीची बातमी खोटी ठरल्यास पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्याचे नमुद होते. त्याच ठारावात शासनाने नियुक्त केलेल्या सहाय्यक नगररचनाकार यांना तत्काळ सेवेतुन मुक्त करुन पालिकतील अधिकारयास त्या पदी नियुक्त करा असे देखील मंजुर केले होते.
तर शहरातील पे एण्ड पार्कचे दर वाढविण्याच्या प्रस्तावात देखील पार्किग इमारतीत मार्केट सुरु करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता.
भाजपाकडून महासभेत आणले जाणरे काही विषय या आधी देखील वादग्रस्त ठरले आहेत. पण एकछत्री वर्चस्वामुळे अडचणीच्या वा नियमबाह्य ठरावांना नाईलाजाने हात वर करावा लागतो असे देखील खाजगीत बोलले जाते.