मराठी येत नाही, इंग्रजीत ट्विट करा
By admin | Published: July 17, 2017 01:17 AM2017-07-17T01:17:05+5:302017-07-17T01:17:05+5:30
रेल्वेच्या खास करून पश्चिम रेल्वेच्या कारभारात मराठी कशी डावलली जाते, याचे प्रत्यंतर मराठी एकीकरण समितीला आले असून
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : रेल्वेच्या खास करून पश्चिम रेल्वेच्या कारभारात मराठी कशी डावलली जाते, याचे प्रत्यंतर मराठी एकीकरण समितीला आले असून मराठीचा वापर वाढण्यासाठी केलेल्या ट्विटला उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याने चक्क इंग्रजी किंवा हिंदीत ट््िवट करण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी थेट रेल्वेमंत्र्यांनाच ट्विट करून संताप व्यक्त केला.
अधिकाऱ्यांना जर मराठी येत नसेल, तर मराठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या केंद्रीय सोशल मीडिया विभागात अथवा जनसंपर्क कार्यालयात नेमावे, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
रेल्वेच्या कारभारात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मराठी एकीकरण समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. तिचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मराठी भाषेचा वापर राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांत प्राधान्याने करण्याबाबत त्या-त्या विभागांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यात रेल्वे अग्रेसर आहे. पश्चिम रेल्वेने तर भार्इंदर रेल्वे स्थानकाचे भायंदर असा नामोल्लेख असलेले फलक नव्याने रंगवण्याची तसदीही घेतलेली नाही. तिकिटांवरही मराठीचा वापर होत नाही. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यावर त्याच्या अपिलासाठी थेट दिल्लीला जाण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.
रेल्वेच्या कारभारात त्रिभाषा सूत्राचा वापर करण्याच्या सूचना असूनही मुंबईत, महाराष्ट्रात मराठीला डावलले जात असल्याबद्दल देशमुख यांनी संपात व्यक्त केला. रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे मराठीला कारभारात प्राधान्य मिळत नसल्याने समितीच्या सदस्यांनी थेट रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटरवरच ‘हल्ला’ केला, पण तेथेही अधिकाऱ्यांनी त्यांना हिंदी किंवा इंग्रजी भाषेतूनच ट्विट करण्याचा सल्ला देत जखमेवर मीठ चोळले आहे.