बाजारात गर्दी करू नका, घराजवळ भाजीपाला उपलब्ध करून देणार, केडीएमसी आयुक्तांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:26 AM2020-03-25T11:26:19+5:302020-03-25T11:26:27+5:30
भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार.
कल्याण - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महानगरपालीका प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरीकांनी भाजी मंडई मध्ये गर्दी करू नये असे आवाहन पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन महानगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरी देखील नागरिक बाजारामध्ये तसेच भाजीमंडईत गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला नागरिकांना घराजवळ मिळण्यासाठी महानगर पालिका प्रशासनाने किरकोळ हातगाडी विक्रेत्यांच्या मार्फत चौकाचौकामध्ये भाजीपाला व फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी देखील मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये याबाबत संबधितांना सूचना देण्याबाबत निर्देश दिले आहेत.
या भाजी विक्रेत्यांनी सर्व सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. मास्क, हातमोजे, तसेच सॅनिटायझर चा वापर करावा. भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, गर्दी करु नका असेही आवाहन महापालिकातर्फे करण्यात येत आहे .
किराणामालाची दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक आहे. उगीचच घाबरून जावून साठा करून ठेवू नका. किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे तसेच नागरिकांनी थेट दुकानात जावून खरेदी करण्यापेक्षा यादी तयार करून पाठवावी. व दुकानदाराने दिलेल्या वेळी जावून सामानाची उचल करावी. जेवढी गर्दी टाळणे शक्य तेवढी गर्दी टाळा,सुरक्षित अंतर राखा प्रशासनास सहकार्य करा,असे कळकळीचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.