करचुकवेगिरी करू नका! लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन; लब्धप्रतिष्ठांना दिल्या कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:20 AM2018-02-04T01:20:49+5:302018-02-04T01:21:00+5:30
सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करत असते. त्याचे हित व्हावे, असे वाटत असेल तर नियमित कर भरणे, ही समाजातील लब्धप्रतिष्ठांची मुख्य जबाबदारी आहे. अनेकदा कर वाचवण्यासाठी आपण दुकानदारांकडून बिल घेत नाही.
ठाणे : सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करत असते. त्याचे हित व्हावे, असे वाटत असेल तर नियमित कर भरणे, ही समाजातील लब्धप्रतिष्ठांची मुख्य जबाबदारी आहे. अनेकदा कर वाचवण्यासाठी आपण दुकानदारांकडून बिल घेत नाही. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराचा पुरेसा पैसा जमा होत नाही आणि याचा परिणाम देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. करसंकलन पुरेसे झाले नाही, तर नागरिकांना सुविधा कशा देणार, त्यामुळे नागरिकांनी कर चुकवेगिरी करू नये, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शनिवारी केले.
रेमण्ड ग्राउंड येथे आयोजित केलेल्या रोटरी डिस्ट्रीक्ट ३१४२ च्या वर्ष २०१७-१८ च्या डिस्कॉन १८ तारांगण वार्षिक परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून रोटरी क्लब जास्तीतजास्त सेवा देण्याचे काम करत आहे. सर्व रोटेरियन सेवा देण्याकरिता झटत असतात. हजारो वर्षांची परंपरा असलेली आपली भारतीय संस्कृती, सभ्यता टिकली आहे. भारताने आपले सांस्कृतिक अस्तित्व टिकवले आहे, हे सांगताना रवींद्रनाथ टागोर यांच्या पंक्ती त्यांनी उद्धृत केल्या. मी लोकसभा अध्यक्षा असल्याने कुणावरही टीकाटिप्पणी करत नाही. देशासाठी काही करायचे असेल, तर ती फक्त सरकारची जबाबदारी नाही. समाजाचा सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा आहे.
महाजन म्हणाल्या की, अर्थसंकल्प हा जमाखर्चाचा ताळेबंद आहे. आपण जो कर देतो, तोच सरकार देशासाठी खर्च करते. पंतप्रधानांचे स्वप्न आहे की, गरीबांना चांगलं जगता आले पाहिजे. परंतु, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कर भरतो का? अनेकदा आपण कर चुकवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा फटका गोरगरिबांच्या योजनांना बसतो. महिलांना अर्थसंकल्पातून काय मिळाले, असा नेहमी विचारला जाणारा सवाल आहे. परंतु, अर्थसंकल्प हा सर्वांसाठी असतो. महिला या काही समाजापासून वेगळा घटक नाही. अर्थसंकल्पाचा परिणाम हा सर्वांवर सारखाच होत असतो.
कर भरल्यामुळे राष्ट्र निर्माण करण्यामध्ये आपली भूमिका महत्त्वाची ठरते. केवळ सेवा नाही तर आपण कोणासाठी काम करतो, हे देखील महत्त्वाचे आहे. विकास हा माणसाकरिता आहे.
हे संवादस्थान, नाट्यगृह नव्हे...
प्रेक्षागृहातील विद्युतव्यवस्थेबाबत सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, कार्यक्रमाला येणारे वक्ते, प्रमुख अतिथी हे विचार करून किंवा अभ्यास करून आलेले असतात. त्यामुळे हे संवादस्थान आहे, नाट्यगृह नाही.
मंचावरून बोलणा-या वक्त्याला किंवा प्रमुख अतिथीला आपण कोणाशी बोलतोय, हेच दिसत नसेल तर त्या संवादाला अर्थ राहत नाही. ज्यांच्याशी संवाद साधायला आलो आहोत, त्यांच्याशी खरंच संवाद साधत आहोत का, असा सवाल त्यांनी केला. लागलीच अंधारात असलेले प्रेक्षागृह प्रकाशमान झाले.