नाल्याचा नैसर्गिक मार्ग वळवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:54 AM2019-05-31T00:54:12+5:302019-05-31T00:54:22+5:30
महापालिकेची तंबी : अधिकाऱ्यांनी केली पाहणी
उल्हासनगर : शहाड फाटक येथील हरमन मोहता कंपनीतून जाणाºया नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवल्याची तक्रार भाजप नगरसेविका चंद्रावती सिंग यांनी केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी नाल्याची पाहणी केली. नाल्याचा नैसर्गिक मार्ग वळवू नये, अशी तंबी दिल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व एकनाथ पवार यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं.-१, शहाड फाटक येथील हरमन मोहता बंद कंपनीच्या जागेवरून एक नाला वाहतो. बांधकामाच्या आड नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवल्याची माहिती नगरसेविका सिंग यांना मिळाल्यावर, त्यांनी पालिका आयुक्तांना याबाबत तक्रार केली.
तसेच शेजारील झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली. आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक विनोद केणे व एकनाथ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नाल्याची पाहणी करून नाल्याचा प्रवाह वळवला नसल्याची माहिती दिली. नाल्याचा प्रवाह वळवू नये, अशी तंबी दिल्याचे केणी व पवार यांनी सांगितले.
दरम्यान, नाला बांधकामाला महापालिकेने मान्यता दिल्याचे उघड झाले. नाला इंग्रजी सी अक्षराप्रमाणे वळवला असून नाल्याची रुंदी सहा मीटरऐवजी तीन मीटर करून त्यावर स्लॅब टाकला, अशी माहिती भाजपाचे युवानेते संजय सिंग यांनी दिली.
नैसर्गिक नाल्याचा मार्ग वळवला असून पावसाळ्यात नाल्याच्या पुराचे पाणी शेजारील झोपडपट्टीत घुसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
याबाबत आवाज उठवल्याने राजकीय दबावाखाली पोलिसांनी जबानी घेण्यासाठी बोलावल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. मात्र, जोपर्यंत अधिकृत समन्स देत नाही, तोपर्यंत जबानी देणार नसल्याची भूमिका सिंग यांनी घेतल्याचे सांगितले.
बांधकाम परवान्याबाबत संभ्रम
बंद कंपनीतील नाला बांधकामाला महापालिकेने मान्यता दिली का, याबाबत नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांच्याशी संपर्क साधला असता, झाला नाही. विभागाच्या अधिकाºयांनी याबाबत सोनावणी यांनाच माहिती असेल, असे सांगितले. संजय सिंग यांनी महापालिकेने नाला बांधण्यास परवानगी दिल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.