खोडा घालू नका, अन्यथा घरावर मोर्चे काढू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:55 PM2018-07-26T23:55:36+5:302018-07-26T23:56:08+5:30
सर्वपक्षीय युवा मोर्चाने दिला इशारा; २७ गावांच्या स्वतंत्र पालिकेच्या मागणीसाठी निदर्शने
डोंबिवली : २७ गावांची स्वतंत्र पालिका व्हावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वतंत्र नगरपालिकेच्या कार्यवाहीत खोडा घालणाऱ्यांना गुरुवारी आंदोलनाच्या माध्यमातून समज देण्यात आली. बेताल वक्तव्य करून खोडा घालण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.
२७ गावांची नगरपालिका स्थापन करण्याच्या विरोधात काही नगरसेवक आणि पुढारी वक्तव्य करत असल्याचा आरोप युवा मोर्चाचा आहे. संबंधित व्यक्तींचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आंदोलनात स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावणाºयांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले जाणार होते. परंतु, दहन आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, या शक्यतेने मानपाडा पोलिसांनी सर्वपक्षीय युवा मोर्चाला नोटीस बजावली होती. त्यामुळे दहन न करता निदर्शने करण्यात आली.
कल्याण-शीळ मार्गावरील स्व. भागाशेठ वझे चौक येथे सकाळी ११ वाजता झालेल्या आंदोलनात गजानन पाटील, सुधीर पाटील, संतोष केणे, गणेश म्हात्रे, रमेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, भ्रष्ट महापालिकेची हाव धरणाºयांचा धिक्कार असो, २७ गावांतील भूमिपुत्रांच्या हरकती व सूचनांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, या मजकुराचे कागदी फलकही झळकावण्यात आले होते.
२७ गावांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना भ्रष्टाचार आणि भूमिपुत्रांच्या जमिनीवरील आरक्षण या मुद्यावरून जुलै २००२ मध्ये केडीएमसीतून २७ गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, कुणाचीही मागणी नसताना जून २०१५ मध्ये पुन्हा गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. ७ सप्टेंबर २०१५ ला पुन्हा ही गावे वगळून त्या गावांचा ‘स्वतंत्र नगरपालिका’ असा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. या अध्यादेशाच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्त कार्यालयात हजारो नागरिकांनी पत्रं सादर केली आहेत. परंतु, ही हरकती, सूचनांची पत्रं बोगस असल्याचे २७ गावांमधील काही नगरसेवकांचे म्हणणे असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे संकेत दिले असताना जाणूनबुजून काही स्वयंघोषित पुढारी स्वतंत्र नगरपालिकेसाठी अडथळा निर्माण करत असल्याने गावांमधील आगरी-कोळी तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असले प्रकार तत्काळ थांबवा, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
नगरसेवकांची पाठ
२७ गावांमधील नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे तेथील नेत्यांकडून सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षरीत्या नगरसेवकांचा सहभाग या आंदोलनात दिसून आला नाही, तर संघर्ष समिती आणि सर्वपक्षीय युवा मोर्चा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. युवा मोर्चा ही तरुणांची संघटना असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.