ताकद दाखवायला लावू नका- प्रताप सरनाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:28 AM2018-04-22T06:28:12+5:302018-04-22T06:28:12+5:30
प्रताप सरनाईकांचा पलटवार : लोकांची भावना समजत नसलेल्यांनी राजकारण करू नये
ठाणे : नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चात मी फक्त सहभागी झालो होतो. मूठभर मतांसाठी लाचार होण्यापेक्षा शेकडो लोकांना काय हवे हे समजत नसेल तर अशा व्यक्तींनी राजकारण करुच नये, असा पलटवार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शनिवारी केला.
कोणाची वैयक्तिक ताकद किती आहे, हे दाखविण्याची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांना दिला. ज्या लोकांनी मते देऊन तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणले आहे, त्यांची कामे करण्याऐवजी तुम्ही सुपारी वाजविण्याची कामे करीत आहात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
नीळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या स्मशानभूमीचा मुद्दा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निकाली निघाला आहे. त्यामुळे पुन्हा महासभेत स्मशानभूमीबाबत चर्चा होणे अतिशय चुकीचे होते. त्यातही शिवसेनेच्याच काही लोकप्रतिनिधींनी पुन्हा स्मशानभूमीच्या ठरावाला मंजुरी देणे हा एकनाथ शिंदे यांचा अपमान असल्याचे खडे बोल सरनाईक यांनी म्हस्के यांचे नाव घेता सुनावले. हा पक्षाचादेखील अपमान असल्याने पालकमंत्री याची गंभीर दखल घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नीळकंठ आणि रेप्टॉकासच्या जागेवरील स्मशानभूमीच्या वादाची राख शमली असतानाच शुक्रवारच्या महासभेत विरोधकांनी पुन्हा त्यात ठिणगी टाकल्याने हा वाद भडकला. रेमंडच्या जागेवर स्मशानभूमीबाबतचा ठराव पुन्हा मांडला गेला. त्यामुळे संतप्त झालेले सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी त्याला मंजुरीही दिली. ती देत असतानाच त्यांनी विरोधकांसह स्वकीयांचाही समाचार घेतला. गिदड की मौत आती है तब बो स्मशान की तरफ दौडता है, अशी टिप्पणी करत त्यांनी सरनाईक यांच्यावर शरसंधान केले. मी पक्ष बदलून आमदार झालेलो नाही, असे सांगत पक्षाशी एकनिष्ठ असल्याची ग्लाही देत बाहेरून आलेल्यांबाबतच्या संतापाला मोकळी वाट करून दिली होती. त्यामुळे त्यावर आमदार सरनाईक काय बोलतात याबाबत उत्सुकता होती. पण पक्षश्रेष्ठीच याबाबत योग्य निर्णय घेतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मूळात नीळकंठ तसेच रेप्टॉकॉसच्या जागेची मागणी आम्ही केलीच नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. ज्या लोकांनी मतदान करुन निवडून दिले, त्यांची कामे न करता काही जण सुपारी वाजविण्याची कामे करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पक्षातील चर्चेनंतर पुन्हा रेमंडच्या जागेचा ठराव करणे हा पालकमंत्र्यांचाच अपमान आहे आणि तो देखील आपल्याच पक्षातील नगरसेवकांनी अशा पध्दतीने अनुमोदन देत मंजूर केला असेल तर तोही एकप्रकारे पक्षश्रेष्ठींविरोधात जाऊन स्वत:चीच भूमिका मांडल्यासारखा आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री घेतीलच, अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली.
आता या विषयावरून पुन्हा कोणाची वैयक्तिक ताकद किती आहे, हे दाखविण्याची वेळ आणू नका, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हस्के यांना दिला. केवळ मूठभर मतांसाठी लाचार होण्यापेक्षा शेकडो लोकांना काय हवे, हे देखील समजत नसेल तर अशा व्यक्तींनी राजकारण करुच नये, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
यात नक्कीच काही अर्थकारण शिजत असणार
स्मशानाच्या बैठकीला बोलावले नाही, असे जर आता कोणी म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. मी प्रत्येकाला बोलावले होते. आमदार केळकर यांचादेखील मला फोन आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.च्या बैठकीत वादावर पडदा पडला असतांना पुन्हा महासभेत हा विषय चर्चेला येतोच, कसा असा सवाल उपस्थित करुन त्यांनी यात काही तरी अर्थकारण नक्कीच शिजत असेल, असा गंभीर आरोप केला. आतापर्यंत जेवढे स्मशानभूमीचे प्रस्ताव पुढे आले, ते कागदावरच राहिले आहेत. आता कुठे स्मशानभूमीबाबत प्रशासन योग्य पावले उचलतांना दिसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.