मीरा-भार्इंदरमधील खड्डे बुजवा नाहीतर वाहने सावकाश चालवा, अशी फलकबाजी करा, मनविसेचे थेट परिवहन आयुक्तांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 04:36 PM2017-09-28T16:36:38+5:302017-09-28T16:37:37+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपहासात्मक पर्याय शोधुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपहासात्मक पर्याय शोधुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) मीरा-भार्इंदर शहर सचिव शान पवार यांनी थेट परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनाच लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
शहरात पावसाळी खड्यांचे कारण पुढे करुन पाऊस थांबल्यासच खड्डे कायमस्वरुपी दुरुस्त केले जातील, असे सबुरीचे आश्वासन पालिका अधिकारी प्रत्येक खड्यांच्या तक्रारीवर देतात. तक्रारदार अथवा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला खड्डे दुरुस्तीचे अल्टिमेटम दिल्यास त्या दरम्यान प्रशासनाकडुन खड्डे दुरुस्तीची मोहिम सुरु केली जाते. परंतु, ती देखील तात्पुरत्या स्वरुपाची. खड्यांत डांबरयुक्त खडी टाकुन तात्पुरती दुरुस्ती उरकली जाते. हि दुरुस्ती काही दिवसांतच पुन्हा उखडुन खड्डे जैसे ते होतात. अथवा खड्यांचा आकार मोठा होऊन वाहनचालकांच्या डोकेदुखीत भर पडते. त्यात अपघाताचे प्रमाण वाढुन अवयवांची दुखणी डोके वर काढतात. शहरात सर्वात जास्त अपघात खड्यांमुळेच होत असल्याचा दावा करीत पवार यांनी आजही शहरातील अनेक वाहतुक रस्त्यांवर खड्यांचे साम्रज्य पसरले असतानाही त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला वेळ नसल्याचा आरोप केला आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच त्यावर थातुरमातूर कार्यवाही करुन तक्रारदारांचे समाधान करण्याचा कारभार पालिकेने सुरु केला आहे. रस्त्यांचे बांधकाम टक्केवारीमुळे निकृष्टदर्जाचे होत असल्यानेच अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचा दावा करीत मनविसेचे शहर सचिव पवार यांनी खड्यांच्या कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे ठोस पर्याय नसल्यास त्यांनी किमान रस्त्यांवरील खड्यांपुर्वी फलके लावुन त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, असा उल्लेख असलेली फलके लावण्याची उपहासात्मक मागणी थेट परिवहन आयुक्तांकडे केली आहे. यामुळे पुढे खड्डे असल्याची खात्री होऊन वाहनचालक वाहने सावकाश चालवुन संभाव्य अपघातापासुन वाचु शकतो, असा कयास लावण्यात आला आहे. त्याचे निवेदन त्यांनी परिवहन आयुक्तांसह स्थानिक वाहतुक शाखेचे वरीष्ठ निरीक्षक जगदिश शिंदे यांना दिले. यावेळी मनविसेचे महेश वाघमारे, अक्षय पिसे, साई परब, विश्वास गवस, तृणाल व्हटकर, गणेश बामणे, वैभव ओझा, महेश चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.