शरीराचे डस्टबिन होऊ देऊ नका, डॉ. जगन्नाथ दीक्षितांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 02:16 PM2019-01-14T14:16:02+5:302019-01-14T14:24:12+5:30
डॉ. जगन्नाथ दीक्षित : रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला; स्थूलतेवर मांडले विचार
ठाणे : जेवण फुकट कसे घालवायचे, या विचारातून आपल्या देशाच्या महिला लठ्ठ झाल्या आहेत. आपण घरातल्या डस्टबिनची काळजी करतो. शरीराचे मात्र डस्टबिन केले आहे, त्याची काळजी करत नाही. यामुळेच अनावश्यक वजन वाढते. पोटाचा घेर वाढतो. गुडघेदुखी, स्नायुदुखीचा त्रास उद्भवतो. चुकीच्या आहारामुळे आता लहान मुलांना टाइप-१ चा डायबेटिस होतो, तर ज्येष्ठांना टाइप-२ चा डायबेटिस होतो, असे प्रतिपादन डाएट सल्लागार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे शुक्रवारी तिसरे पुष्प गुंफताना ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्ती’ या विषयावर ते बोलत होते. भारतात २० टक्के लोकांना डायबेटिस आहे. बिनकामाचे इन्शुलिन निर्माण झाल्यामुळे डायबेटिस होतो. वारंवार खात राहिलात, तर इन्शुलिनची पातळी वाढेल. यामुळे दोन वेळा जेवा आणि खाणेपिणे ५५ मिनिटांत आटोपा. सहा ते आठ तास झोप घेतल्यावर दिवसातून दोन वेळा जेवताना जेवणाआधी एक तास अगोदर पाणी प्या. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या. गरज वाटलीच तर जेवताना घोटघोट पाणी प्या. दिवसातून तीन ते चार लीटर पाणी प्या. दिवसातून सव्वा ते दीड लीटर लघवी होईल, इतके पाणी प्या, असा सल्ला त्यांनी दिला. दिवसातून फक्त दोन वेळा जेवण करा. अवघ्या तीन महिन्यांत वजन कमी होईल.
पोटाचा घेर कमी होईल. डायबेटिस दूर होईल, अशी जाहीर हमी त्यांनी दिली. आपल्याकडे दोन वेळच्या जेवणाची प्रथा होती. आपणाकडे कधीही नाश्ता करण्याची पद्धत नव्हती. राम-कृष्ण नाश्ता करत असल्याचा उल्लेख पुराणात नाही. आपले पूर्वज नाश्ता करत असल्याचा कोणताही उल्लेख वेद किंवा ग्रंथांत नाही. नाश्ता हा प्रकार ब्रिटिशांनी आणला. त्यांनी चहा आणला आणि फुकट वाटला. तेव्हापासून चहा-नाश्ता हा प्रकार सुरू झाला. दिवसातून दोन वेळा जेवा, असा उल्लेख आयुर्वेदात आहे.
दोन वेळा जेवा, पुण्य मिळेल, असे त्यात म्हटले आहे. कितीतरी खाण्याने जास्त लोक मरतात, पण उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही.
आपण ६० दिवस उपाशी राहू शकतो. आपले पूर्वज शिकार मिळायची, तेव्हाच खायचे, नाहीतर उपाशी राहायचे. तुमचे आरोग्य तुमच्या हाती आहे. मानवतेच्या सेवेसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा प्रयोग सुरू करा, असे आवाहन त्यांनी केले.