पूल पाडू नका, डागडुजी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:57 AM2019-05-29T00:57:32+5:302019-05-29T00:57:37+5:30
डोंबिवली पूर्व-पश्चिेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक झालेला नाही.
कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक झालेला नाही. त्याची दुरुस्ती करता येऊ शकते. या पुलावर महापालिकेने डांबरीकरण केले आहे. तसेच, दुतर्फा पदपथाचे कामही केले आहे. त्यामुळे पुलावर वाढलेला भार हलका करण्याची तयारी केडीएमसीने दर्शवली आहे. पुलाची दुरुस्ती करताना पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याची मागणी महापालिकेच्या लोकप्रतिनिधींनी मंगळवारी झालेल्या बैठकीत केली. मात्र या बैठकीतून ठोस काही निर्णय झाला नाही. त्यामुळे बुधवारी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे होणाऱ्या बैठकीतून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
२७ मे पासून कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने महापालिकेस मिळाल्याने लोकप्रतिनिधींनी पूल बंद करण्यासंदर्भात विरोध केला. पुलासंदर्भातील आयआयटी संस्थेचा अहवाल मागितला गेला. रेल्वेकडे विविध प्रश्नांच्या माध्यमातून विचारणा केली गेली. तसेच पूल बंद केल्यास पर्यायी वाहतुकीचा पर्यायी मार्ग म्हणून ठाकुर्लीचे रेल्वे क्रॉसिंग खुले करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेने या प्रकरणी दोन दिवसांचा अल्टिमेट महापालिकेस दिला होता. जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन केले होते.
महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीस महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, मनसे गटनेते मंदार हळबे, मध्य रेल्वेचे अधिकारी, शहर अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत महापालिका प्रशासनाने रेल्वेकडे पूलासंदर्भातील आयआयटीचा अहवाल मागविला होता. त्यानुसार हा अहवाल सदस्यांसह आयुक्तांना दिला गेला. या अहवालानुसार पुलाचा डेस्क स्लॅब कमकुवत झाला आहे. तसेच पुलाच्या सळया उघड्या पडल्या आहेत.
पॅराफीट वॉल खराब झाली आहे. स्टीलचे गर्डर गंजले आहेत. पुलासाठी केलेले काँक्रिटीकरण खराब झाले असून कॉलम बीमही दुरुस्त करावे लागणार आहे. अहवालातील मुद्द्यानुसार पूल तातडीने पाडण्याची गरज नाही. वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे बंद न करता ही दुरुस्ती करा, अशी मागणी सदस्यांनी बैठकीत केली. तसेच पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पूल बंद ठेवायचा झाल्यास ठाकुर्ली येथील रेल्वे क्रासिंग खुले करून द्यावे, अशीही सदस्यांनी मागणी केली. त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची दुरुस्तीदरम्यान वाहतूक पूर्ण बंद ठेवावी की पर्याय म्हणून रेल्वे क्रॉसिंग खुले करावे, याचा निर्णय विभागीय व्यवस्थापक घेऊ शकतात. हा निर्णय आमच्या हाती नाही. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा बुधवार, २९ मे रोजी विभागीय व्यवस्थापांकडे बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार
डॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थित
राहणार आहेत.
>दुरुस्ती होणार
पुलावर सातत्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच, पुलाच्या दुतर्फा पादचाºयांसाठी पदपथाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुलावरचा भार वाढला आहे. डांबराचा थर व पदपथासाठी वापरलेले सिमेंट काँक्रिटीकरण काढण्याची कार्यवाही महापालिकेकडून तातडीने केली जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच पुलाच्या खालच्या भागाची दुरुस्ती तातडीने सुरू केली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.