...तोपर्यंत जादा भाडे देऊ नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:56 PM2019-02-01T23:56:56+5:302019-02-01T23:57:15+5:30
काही रिक्षा संघटनांच्या मनमानीमुळे रिक्षाभाड्यावरून प्रवाशांमध्ये संभ्रम
डोंबिवली : काही रिक्षा संघटनांच्या मनमानीमुळे रिक्षाभाड्यावरून प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्याचा इशारा कल्याण आरटीओने नोटीस बजावून डोंबिवलीतील रिक्षा संघटनांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रामनगर वाहतूक शाखेत झालेल्या समन्वय बैठकीत दोन दिवसांत सुधारित भाड्याचा तक्ता लावण्यात येणार असल्याचा ठराव करण्यात आला. नवीन भाडेवाढ जाहीर होईपर्यंत कुणीही जादा पैसे देऊ नये, असे आवाहन आरटीओने केले आहे.
बैठकीला आरटीओ अधिकारी अविनाश मराठे, वाहतूक पोलीस निरीक्षक हेमंत जाधव, लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर तसेच प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. एका युनियनने भाडे दरपत्रक लावून प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जात आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून त्यातून अनुचित घटना घडण्याची शक्यता आरटीओ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर कोमास्कर म्हणाले की, आरटीओ सुधारित भाड्याचा फलक लावणार होती. दोन महिने झाले, पण त्यांनी ते न लावल्याने २०१४ मध्ये मंजुरी मिळालेले दरफलक लावले आहे. आरटीओ हा फलक लावणार असेल, तर सध्याचा फलक काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर मराठे म्हणाले की, वरिष्ठांसमवेत चर्चा करून आगामी दोन दिवसांत त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. आरटीओ आणि युनियनद्वारे फलक लावणे जास्त सयुक्तिक ठरेल. कोमास्कर यांनीही त्याला तयारी दर्शवत काही संभ्रम असेल, तर तो दूर करावा, असे सांगितले. वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांनी शहरातील बेकायदा रिक्षा वाहतूक, स्टॅण्डसंदर्भात युनियनच्या पदाधिकाºयांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
आरटीओने भाडे आकारण्यासंदर्भात फलक लावल्यानंतरच किती भाडेवाढ झाली आणि कोणत्या मार्गावरील सध्याचे भाडे कमी झाले, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने जाहीर केल्याशिवाय प्रवाशांनी जादा किंवा कमी भाडे देऊ नये. सध्या जे भाडे आहे, तेच द्यावे. रिक्षाचालकांनीही प्रवाशांची अडवणूक करू नये.
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण