खासगी आयुष्यात डोकावू नका, सर्वोच्च न्यायालयानंतर लोकांनीही टोचले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:50 AM2018-07-15T02:50:36+5:302018-07-15T02:50:39+5:30

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर लक्ष ठेवण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असताना आता या योजनेवर नेटकऱ्यांनीही सडकून टीका केली आहे.

Do not peek in private life | खासगी आयुष्यात डोकावू नका, सर्वोच्च न्यायालयानंतर लोकांनीही टोचले कान

खासगी आयुष्यात डोकावू नका, सर्वोच्च न्यायालयानंतर लोकांनीही टोचले कान

Next

ठाणे : व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर लक्ष ठेवण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असताना आता या योजनेवर नेटकऱ्यांनीही सडकून टीका केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर पाळत ठेवणे, हा आमच्या प्रायव्हसीचा भंग असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीमधील व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारी भूमिका घेणारे नेते कुणीही असो, त्याचा पक्ष कुठलाही असो, त्याला निवडणुकीत धडा शिकवण्याची भाषा तरुणाई बोलू लागली आहे.
मित्रमैत्रिणी, प्रेयसीप्रियकर एकमेकांशी काय बोलतात, ही संपूर्ण आमची खाजगी बाब आहे. यात सरकारने डोकावणे चुकीचे आहे. आम्ही या निर्णयाला विरोध करू, अशा शब्दांत सोशल मीडियावर तरुणांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नेटकºयांनी आपल्या प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. यात कुटुंबसदस्य, मित्रमैत्रिणी, प्रियकरप्रेयसी एकमेकांशी बोलत असतात, गप्पा मारतात, अनेक प्लान्स तयार करत असतात. एकमेकांकडे व्यक्त होत असतात. या सर्व गप्पांमध्ये डोकावण्याचा अधिकार सरकारला दिलाच कुणी?
सोशल मीडियाने केंद्रात नरेंद्र मोदी यांना भरभक्कम बहुमत देऊन पंतप्रधान केले. आता त्याच सोशल मीडियावरील टीका सरकारला का झोंबते, असा सवाल तरुणाई करत आहे. जेव्हा आम्ही भाजपाच्या सोशल मीडियाने तयार केलेले संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करत होतो, तेव्हा यांना गुदगुल्या झाल्या. आता भाजपाच्या महागाई, बेरोजगारी, असहिष्णुता याविरोधातील मेसेज फॉरवर्ड व्हायला लागल्यावर यांच्या पोटात का दुखते, असे सवाल तरुणांनी केले. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे. कोण काय फॉरवर्ड करते, यावर लक्ष ठेवायला निवडून दिलेले नाही. आधी फेसबुकवर अशी बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. सरकार सोशल मीडियावर लक्ष ठेवणार, अ‍ॅडमिनला अटक करणार, अशा अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले, तरी नेटिझन्स सरकारविरोधी बोलण्याचा हक्क बजावणारच, असा टोला तरुणांनी दिला.
आम्हा तरुण मंडळींना आमचे पालक प्रायव्हसीबाबत मोकळीक (स्पेस) देतात. मग, आमच्या खासगी आयुष्यात डोकावणारे सरकार कोण आले? सीमेवरील घुसखोरी यांना थांबवता येत नसेल, खोटी ओळखपत्रे बनवून राहणाºया बांग्लादेशी अन् इतरांवर कारवाई करणे शक्य नसेल, चीनमधून येणारी काही घातक रसायने व इतर बेकायदेशीर गोष्टी थांबवता येत नसतील, तर सरकारवर टीका होणारच. ‘व्हॉट्सअ‍ॅपवर लक्ष’ ठेवण्यामुळे ती टीका थांबणार नाही. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात सरकार डोकावणार असेल, तर आम्ही तरु ण मंडळी ते अ‍ॅप आणि सरकार जरूर बदलू, हे ध्यानात ठेवा.
- सर्वेश तरे, कशेळी
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक नंबर पोलिसांचा असेल, असे संदेश सरकारचे हस्तक गेले काही दिवस पसरवत आहेत. असे फेक मेसेज पाठवून आपण या देशातील तरुणांना मूर्ख बनवू, असे त्यांना वाटतेच कसे? पोलिसांकडे लक्षावधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील कोट्यवधी मेसेजवर नजर ठेवण्याइतके मनुष्यबळ तरी आहे का? वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याकरिता सायबर सेलची बांधणी मोठ्या प्रमाणात करायला हवी. व्हॉट्सअ‍ॅपवरील फेक मेसेजचे साम्राज्य संपवायला हवे.
- सायली चव्हाण, कल्याण
सुप्रीम कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण योग्यच आहे. अफवा रोखण्यासाठी जनजागृती करता येईल. आयटी अ‍ॅक्ट आणखीन सक्षम करता येईल. व्हॉट्सअ‍ॅपला फेक न्यूज ओळखण्याची आणि प्रसारणासंबंधी कठोर उपाय करायला सांगता येतील. असे अनेक उपाय तज्ज्ञांच्या साहाय्याने करता येतील. लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर लक्ष ठेवणे ही यंत्रणेची हतबलता वाटते. आम्ही आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये काय बोलतो, याची माहिती करून घेणे म्हणजे अतीच झाले.
- विश्वास उद्गीरकर, बदलापूर
आपण म्हणतो की, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मग, जर सरकारच आपलं व्हॉट्सअ‍ॅप तपासायला लागले तर ते कितपत योग्य आहे? आपण आपला मोबाइल घरात आईवडिलांनाही देत नाही, मग सरकारने तो का बघावा? मुळात व्हॉट्सअ‍ॅप ही एक खासगी गोष्ट आहे. सरकारने आखलेली नवीन योजना न पटण्यासारखी आहे.
- आदित्य नाकती, ठाणे
सरकारविरोधी बोलणं याचा अर्थ राष्ट्रद्रोही असणे असा लावण्याचा मठ्ठपणा सरकारने करू नये. आधारकार्ड सगळीकडे लिंक करूुन कोण काय खरेदी करतात, यावर लक्ष ठेवले येथवर ठीक होते. पण, सोशल मीडियाचा संकोच अतीच झाला. - हनिफ तडवी, डोंबिवली
सोशल मीडियामुळे माणसाच्या स्पष्ट विचारांना वाव मिळाला; पण सरकारने आणलेली नवीन नियमावली आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. आमच्यासारख्या तरुणाईच्या मतस्वातंत्र्यावर आणि आमच्या व्यक्तिगत आयुष्यावर सरकार टाळे लावू पाहते आहे.
- अस्मिता राजेशिर्के, डोंबिवली
व्हॉट्सअ‍ॅप हा खाजगी अ‍ॅप आहे आणि आपण चर्चेसाठी, संवादासाठी तो वापरतो. पण, जर सरकार व्हॉट्सअ‍ॅपवरील खाजगी बाबींमध्ये डोके घालत असेल, तर आपल्या खाजगी आयुष्यात ती ढवळाढवळ असेल.
- शुभांगी गजरे, ठाणे

Web Title: Do not peek in private life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.