...अन्यथा कचरा उचलू नका!
By Admin | Published: March 8, 2016 01:40 AM2016-03-08T01:40:54+5:302016-03-08T01:40:54+5:30
ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या नोटीसांना शहरातील गृहसंकुलांनी केराचीच टोपली दाखविली आहे. जी गृहसंकुले कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्रवेशद्वारजवळ ठेवत नसल्यास
भार्इंदर : ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या नोटीसांना शहरातील गृहसंकुलांनी केराचीच टोपली दाखविली आहे. जी गृहसंकुले कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्रवेशद्वारजवळ ठेवत नसल्यास त्यांचा कचराच उचलू नका, अशी सक्त ताकीद आयुुक्त अच्युत हांगे यांनी स्वच्छता विभागाला दिली आहे. त्यासाठी लेखी आदेश हवा असल्यास तसे पत्र सादर करुन माझी सही घ्या, असा सल्लाही आयुक्तांनी विभागाला दिला आहे.
पालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरातील गृहसंकुलांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या नोटीसा नुकत्याच बजावल्या आहेत. तसे न केल्यास नळ जोडणी तोडण्याचा फतवा काढला आहे. याची अंमलबजावणी पालिकेने सुरु केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करुनच त्याची विल्हेवाट लावण्याची सूचना सफाई कंत्राटदारांना करारानुसारच केलेली आहे. या सूचनेला अद्याप एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद न देता त्याला पायदळीच तुडविल्याचे प्रत्येकवेळी दिसून आले आहे. नागरीकांमध्येही याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण न करता एकत्रित कचराजमा करुन गृहसंकुलाबाहेर ठेवतात. कचऱ्याचे वर्गीकरण उत्तनकरांचा तेथील डम्पिंग ग्राऊंडला असलेल्या विरोधातून पुन्हा चर्चेत आले आहे. उच्च न्यायालयानेही उत्तनकरांच्या नागरी हक्क समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने तसेच वर्गीकरण करुनच डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्याची तात्पुरती परवानगी पालिकेला दिली आहे. त्यामुळे पालिकेने येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये केवळ ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेत सुका कचऱ्यासाठी तेथीलच एका शेडसह इतरत्र सोय केल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)