रेल्वे अपघाताचे राजकारण करू नका; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 11:07 AM2023-06-05T11:07:12+5:302023-06-05T11:07:52+5:30
ओडिशातील रेल्वे अपघाताचे राजकारण न करता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या दाैऱ्यावर असलेल्या अनुराग ठाकूर यांनी नऊ वर्षांतील केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची जंत्री वाचून दाखवली. २०२४ मध्ये माेदीच पुन्हा पंतप्रधान हाेतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच ओडिशातील रेल्वे अपघाताचे राजकारण न करता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
टाऊन हॉलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुद्रा लोन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, घरगुती गॅस, नळजोडणी, शौचालय, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन, देशाच्या विकासाचा आलेख, संरक्षण साहित्यात स्वयंसिद्धता आदींचा आढावा घेतला. यावेळी ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचे विरोधकांनी राजकारण न करता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मोदी यांचा झंझावात देशच नव्हे तर जग ओळखून आहे. त्यामुळे २०२४ ला पुन्हा मोदी सरकारच बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे ते म्हणाले.
ठाकूर यांनी गेल्या दाैऱ्यात शहरातील रस्ते, पाणीटंचाई, स्वच्छता आदी समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच पुढील दौऱ्यात याबाबत आढावा घेणार असल्याचा दम अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, यावर त्यांनी रविवारी मौन बाळगले. मैदानाच्या प्रश्नावरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या पत्रकार परिषदेला आमदार संजय केळकर, कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी, गुलाब करनजुळे आदी उपस्थित होते.