बदलीबाबत शिफारस आणू नका
By admin | Published: May 4, 2017 05:48 AM2017-05-04T05:48:33+5:302017-05-04T05:48:33+5:30
महापालिका शाळेच्या शिक्षकांच्या सरसकट बदल्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापौर, शिक्षकसेना,
उल्हासनगर : महापालिका शाळेच्या शिक्षकांच्या सरसकट बदल्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापौर, शिक्षकसेना, शिवसेनेच्या शिष्टमंडळासह अनेक शिक्षकांनी आयुक्तांकडे धाव घेत बदल्यांबाबत फेरविचाराची मागणी केली. शिक्षकांच्या बदल्या करणे, हा प्रशासनातील एक भाग आहे. याबाबत, कुणीही शिफारस घेऊन येऊ नये, अशी तंबीच आयुक्तांनी दिली. तसेच शिक्षकांना बुधवारीच बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळातील सावळागोंधळ उघड झाल्यावर आयुक्त सुधाकर शिंदे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला शिक्षकांची बदल्या करून शिक्षकांना पहिला धक्का दिला. तसेच बुधवारी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश शिक्षकांना देत कारवाईचे संकेत दिले. शिक्षक बदल्यांचा शिक्षकसेनेने विरोध केला. महापौर मीना आयलानी यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या शिष्टमंडळाने शिक्षक बदल्यांबाबत फेरविचार करण्याची विनंती आयुक्तांना केली. मात्र, आयुक्त बदल्यांवर ठाम राहिल्याने बहुतांश शिक्षक बदल्यांच्या ठिकाणी हजर झाले होते.
महापौरांनी बदल्यांबाबत सुरुवातीला शिक्षकांना आश्वासन दिले होते. तसेच प्रत्येक शिक्षकाच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. मात्र, आयुक्त शिंदे बदल्यांबाबत ठाम राहिल्याने महापौरांचेही काहीही चालले नाही. तीच स्थिती शिवसेना शिष्टमंडळाची झाली. सकाळी ११ वाजल्यापासून शिक्षकांनी पालिका मुख्यालयात गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यांनी शिंदे यांना भेटण्याचे प्रयत्न केले. मात्र, आयुक्तांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही.
दरम्यान, वादातीत शिक्षण मंडळाचे कार्यालय महापालिकेच्या इमारतीत स्थलांतरीत करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. यामुळे पारदर्शक कारभार होईल अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
ंमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना घालणार साकडे
सरकारी नियमानुसार एकाच वेळी सरसकट बदल्यांचा नियम नाही. मात्र, त्याला छेद देत आयुक्तांनी बदल्या केल्या असून त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शिक्षकसेनेने सुरू केली आहे. शिक्षक परिषदही शिक्षकांसाठी मैदानात उतरली आहे. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना साकडे घालणार आहे.
निविदा, कर्मचारी भरतीची होणार चौकशी
शिक्षण मंडळातील कोट्यवधींचे निविदा प्रकरण, खरेदी घोटाळा यासह मंडळातील कर्मचाऱ्यांची भरती तसेच शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांचा विषय हाताळणार आहेत. आयुक्तांच्या झटपट निणयाने सर्वांच्या नजरा खिळल्या असून कंत्राटदार, प्रशासन अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी अभियंता यांचे धाबे दणाणले आहे.