कोरोना लस घेतल्यानंतर घाई करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:34+5:302021-06-22T04:26:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाची लस घेतल्यानंतर सध्या काही ठिकाणी नागरिक थांबत नाहीत. परंतु, हे काही प्रमाणात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाची लस घेतल्यानंतर सध्या काही ठिकाणी नागरिक थांबत नाहीत. परंतु, हे काही प्रमाणात धोक्याचे ठरू शकते. मुळात लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या नागरिकावर काही वेगळे परिणाम होतात का, यासाठी त्यांना अर्धा तास थांबविले जाते. मात्र, काही जणांना घाई असल्याने ते घरी जाण्याच्या तयारीत असतात. परंतु, अशा वेळेस चक्कर येणे किंवा कणकण किंवा ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळेच लस घेतलेल्यांनी किमान अर्धा तास केंद्रातच थांबावे, असे संकेत आहेत.
जानेवारीपासून सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १९ लाख ५९ हजार ५६८ जणांचे लसीकरण झाले आहे. यात अगदी नगण्य प्रमाणात लस घेतलेल्यांना त्रास झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये लस घेतल्याच्या जागेवर गाठ येणे, अंगदुखी, ताप अशा काही घटना समोर आल्या आहेत. यापलीकडे जाऊन इतर कोणताही त्रास लस घेतलेल्यांना झाला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. परंतु, लस घेण्याआधी प्रत्येकाने काही तरी खाऊन जाऊन नंतरच लस घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर जास्तीचा त्रास होत नाही. ती घेतल्यानंतर कोणता त्रास होत आहे का?, याची माहिती घेण्यासाठी प्रत्येकाला देखरेखीखाली अर्धा तास ठेवून त्यानंतरच घरी सोडले जात आहे. परंतु, काही ठिकाणी लस घेतलेल्या नागरिकांना घरी जाण्याची घाई अधिक असते. त्यामुळे कदाचित अंगदुखी सुरू होणे, ताप येणे असे प्रकार घडण्याची शक्यता असते. हे टाळायचे असेल, तर लस घेतल्यानंतर शक्यतो अर्धा तास केंद्रावर थांबणे महत्त्वाचे आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण...
एकूण लसीकरण - १९ लाख ५९ हजार ५६८
पहिला डोस - १५ लाख ५७ हजार ५३८
दुसरा डोस - चार लाख दोन हजार ३०
एकूण लसीकरण केंद्रे - ३२५
३० ते ४४ वयोगटासाठी केंद्रे - ५६
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
ज्या व्यक्तीला लस दिली जाते, त्या व्यक्तीला लसीकरणानंतर कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे का, चक्कर येते का, ताप येतो का, अंग दुखते का, लस दिल्याच्या जागेवर गाठ आली आहे का... याची माहिती घेण्यासाठी संबंधीताला अर्धा तास केंद्रावर थांबविले जाते.
लस हेच औषध
सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे लस घेणे कधीही महत्त्वाचे आहे. कोव्हॅक्सिनची लस घेतली तर सहसा कोणताही त्रास होत नाही. परंतु, कोविशिल्डची लस घेतल्यानंतर साधारपणे कणकण येणे, ताप येणे, अंगदुखी असे प्रकार आढळून येत आहेत. त्यामुळे त्यावर साधी तापावरील अर्धी गोळी खाणे योग्य आहे. परंतु, लस घेण्यासाठी कोणतीही टाळाटाळ न करता, कोरोनाला रोखायचे असेल, तर लस हाच पर्याय आहे.
....
लस दिल्यानंतर कोणता त्रास होत आहे का, काही साईड इफेक्ट होत आहेत का, याची माहिती घेण्यासाठी लस दिल्यानंतर संबंधीतांना काही वेळ केंद्रात बसविले जाते. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी लस हाच सध्या एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन लस घ्यावीच.
- डॉ. कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे