गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छता अभियानाकडे बघताना ते साध्य करणार्या सफाई कर्मचार्यांची दशा सरकारला दिसत नाही का?- जगदीश खैरालिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:55 PM2018-01-31T15:55:40+5:302018-01-31T15:58:12+5:30
सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचे पुढचे पुष्प जगदीश खैरालिया यांनी गुंफले. गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छता अभियानाकडे बघताना ते साध्य करणार्या सफाई कर्मचार्यांची दशा सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाणे : ‘गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि न्याय या मूल्यांबरोबरच समाजाला बौद्धिक श्रम आणि शारिरीक श्रम यांचा सारखाच सन्मान करण्याची शिकवण दिली. पण आज गांधीजींच्या नावाने आणि त्यांच्या चष्म्याचे चिन्ह वापरुन वाजत गाजत सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात फक्त दिखाऊ स्वच्छतेला महत्व दिलं जातंय,या अभियानाच्या प्रचारासाठीच्या जाहिरातींवर लाखो करोडो रुपये खर्च केले जातायत पण ही स्वच्छता करण्यासाठी ज्या सफाई कामगारांचा घाम गळतोय त्यांच्या सोयी सुविधेसाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी काहीही विचार केला जात नाही. संविधानातील तरतुदींमुळे कायद्याने गेली असली तरी आजही समाजाच्या मनातून अस्पृश्यता जात नाही हे आजचे विदारक सत्य आहे,” असे ठाण्यातील सफाई कामगारांच्या वस्तीत वाढत, त्यांची दुर्दशा अनुभवत मोठे झालेले आणि त्यांच्यासाठी तळमळीने कार्य करणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी गांधी स्मृतिदिनाचे औचित्य साधत ‘सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत’ ‘महात्मा गांधींचे विचार आणि आजचे स्वच्छता अभियान’ या विषयावर बोलताना म्हटले.
ते पुढे म्हणाले, ”आज सर्वच ठिकाणी कंत्राटी सफाई कामगारांची संख्या कायम सफाई कामगारांपेक्षा जास्त आहे. आता तर १००% सफाई कामगार कंत्राटावर ठेवण्याचा विचार सरकार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले आहेत की कंत्राटवर काम करणार्या सफाई कामगारांनाही कायम स्वरूपी कामगारांप्रमाणे किमान वेतन, युनिफॉर्म, रजा, ग्राचुइटी आणि इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरीही आजतागायत कोणतेही सरकार ही गोष्ट अमलात आणत नाही. या उपर आता तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या वेतनाच्या खर्चात कशी कपात करता येईल याचे जीआर निघत आहे आणि वरच्या श्रेणीतील अधिकार्यांच्या वेतनात सतत वाढ होते आहे. अशा प्रकारे आर्थिक विषमता आणि त्याचा परिणाम म्हणून सामाजिक विषमता वाढवण्याचे काम आज सरकारे करीत आहेत. या विरूद्ध सभागृहामध्ये आवाज उठवणारे आज कोणीच राहिले नाहीत. तसेच गांधींजीचा साधेपणाचा आग्रहही आजच्या झगमगाटात विरून गेला आहे.”या वेळी समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ अध्यक्षस्थानी होते.ठाण्यातील मान्यवर नागरिक शुभानन आजगावकर, मृणाल बोरकर, विवेक बोरकर, नरेश भगवाने,बिरपाल भाल, स्नेहल काळे, मनीषा जोशी, लतिका सु.मो., हर्षलता कदम, अजय भोसले शैलेश राठोड,विक्रांत कांबळे, संतोष चव्हाण या वेळी उपस्थित होते.‘समता विचार प्रसारक संस्थेतर्फे’ ‘सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत’ चहुबाजुने पसरलेल्या ठाण्यातील विविध वस्त्यांमध्ये नागरिकांना अनेक विषयातील तज्ञ मान्यवरांची व्याख्याने त्यांच्याच विभागात आयोजित केली जातात जेणेकरून त्यांना त्यांच्या घराजवळ चांगले विचार ऐकण्याची संधी मिळावी. आज या मालिकेची सांगता सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ डॉ. शुभा थत्ते यांच्या ‘तरुणांचे प्रश्न आणि सद्यस्थिती’ या विषयावरील व्याख्यानाने सावरकर नगर येथील महापालिका शाळा क्रं.१२० येथे संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. यावेळी वंचितांच्या रंगमंचावर गाजलेली ‘कॉम्प्लिकेटेड’ ही नाटिका सादर होणार आहे.