‘फोनी’च्या भीतीमुळे रात्रभर झोप नाही, ओडिशा, प. बंगालमधील तरुणांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:06 AM2019-05-05T04:06:24+5:302019-05-05T04:06:45+5:30
ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही. आता केवळ कुटुंबीयांची काळजी करणे एवढेच आमच्या हाती आहे. इथे मन रमत नसले तरी करणार काय? येथे मिळणारी रोजीरोटीच गावाकडच्या कुटुंबाची आशा आहे. आम्हाला पुन्हा सर्व नव्याने उभे करावे लागेल. या अस्मानी संकटाला सामोरे जाण्याची ताकद आम्हाला द्यावी, हीच ईश्वराकडे मागणी आहे, असे ओडिशामधील देवकुमार मेतेई याने पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी सांगितले.
पश्चिम मेदनापूरच्या दानतन गावातून कामानिमित्त डोंबिवलीत आलेल्या देवकुमारच्या चेहºयावर गावाकडची ओढ सतत दिसत होती. तो सतत फोनवरून कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. तुम्ही सर्व सुखरूप आहात ना. इतर कशाचीही काळजी करू नका. पुन्हा नव्याने सर्व उभे करू, असा सतत घरच्यांना फोनवरून धीर देत आहे.
कल्याण-डोंबिवलीतील विविध हॉटेलमध्ये ओडिशा, पश्चिम बंगालमधून आलेले माझ्यासारखे शेकडो तरुण काम करत असल्याचे त्याने सांगितले. वेटर म्हणून आम्हाला महिन्याला १२ ते १५ हजार रुपये पगार मिळतो. या पैशांवरच आमचे कुटुंब चालते. देवकुमारप्रमाणेच शिवशंकर मेतेई, मनोज डे, सपन मेतेई, सुदीप डे, हेमाद्रीकर, हेमंत दास, जयंता दास, आशुतोष जे., गीताई सुसुमार यांचीही व्यथा आहे. हे सर्व पश्चिम बंगाल, ओडिशाच्या सीमावर्ती भागातील तरुण आहेत. त्यांच्यापैकी काहींनी ‘लोकमत’कडे आपल्या मनातील दु:खाला वाट करून दिली. घर, शेती सर्व उद्ध्वस्त झाले असले, तरी आमची जीवाभावाची माणसे सुखरूप आहेत, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. वादळात उद्ध्वस्त झालेली घरे, गावे पुन्हा उभी करू, असा विश्वासही त्यांच्या डोळ्यांत यावेळी दिसला.
चक्रीवादळाने सर्वस्व हिरावले!
आधीच गरिबी असताना चक्रीवादळाने आमचे सर्वस्वच हिरावून घेतले. घरच्यांच्या चिंतेने आम्ही रात्र जागून काढली. त्यांनी कालपासून काही खाल्ले आहे की नाही, ते सुखरूप तर आहेत ना, अशी काळजी सतत मन कुरतडत आहे. पगार मिळताच तो गावी पाठवण्याची व्यवस्था करायची आहे, असे देवकुमारने सांगितले.