मुंब्रा बायफास दुरुस्तीदरम्यान टोल बंद करा, अन्यथा कायदा हातात घेऊ - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 02:18 PM2018-05-09T14:18:15+5:302018-05-09T14:18:15+5:30
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
ठाणे- मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंयत ऐरोली आणि मुंबईला जाणार टोल बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. टोल बंद न केल्यास कायदा हातामध्ये घेऊन स्वतः टोल बंद करण्याचा इशारादेखील आव्हाड यांनी दिला आहे. दोन वर्षांपूर्वी मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पाठपुरावा करूनही शासनाने या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले असून शहरातील वाहतूक समस्येकडे शासन आणि ठाण्यातील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आव्हाड यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
मंगळवारपासून मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे होणारा वाहतूक कोंडीचा फटका मात्र ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहनचालकांना होत आहे. दोन महिने हे दुरुस्तीचे काम सुरु राहणार असल्याने दोन महिने आता ठाणेकरांना तसेच नवी मुंबईच्या वाहनचालकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. बायपासच्या दुरुस्तीच्या कामावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनावर तसेच ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली असून पालकमंत्र्यांनी केवळ पालकत्व संभाळण्यापलीकडे दुसरे काही केले नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे शासनाने तसेच सत्ताधाऱ्यांनी नेहमीची दुर्लक्ष केले असल्याचे म्हणाले. मुंब्रा बायपास धोकायदाक झाला असल्याचे यापूर्वीच आयआयटीचा अहवाल होता.
मी देखील दोन वर्षांपासून मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच कोपरी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती बरोबरच विटावा ते कोपरी पुलासाठी तसेच भिवंडी बायपाससाठीदेखील पाठपुरावा केला होता. मात्र या शासनाने या महत्त्वाच्या गोष्टींकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. साकेत आणि रुस्तमजीच्या बाजूने सर्व्हिस ब्रिज बांधण्याचीदेखील आपली मागणी आहे .
मंगळवारपासून सुरु झालेल्या मुंब्रा बायपासमुळे दोन महिने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याने या दुरुस्तीच्या कालावधीत ऐरोली तसेच मुंबईकडे जाणारा टोल बंद करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे . तसे न केल्यास सोमवार पासून स्वतः टोल नाके बंद करून असा इशारा आव्हाड यांनी शासनाला दिला आहे .
एकच टोल भरण्याची घोषणा हवेतच -
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कालाधित वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी एकच टोल भरण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरुस्तीचे काम सुरु होण्यापूर्वी केली होती . त्यामुळे वाहन चालकांना एक तर ऐरोली किंवा मुलुंडचा असा एकच टोल भरावा लागणार होता . मात्र पालकमंत्र्यांच्या या घोषणेची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली असून दोन्हीकडे वाहन चालकांना टोल भरावा लागत आहे . आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोल बंद करण्याची मागणी केली असल्याने टोल बंदीचा प्रश्न अधिक चिघळणार आहे .