मुख्यमंत्री व्हायचे नाही!
By admin | Published: March 23, 2016 02:05 AM2016-03-23T02:05:53+5:302016-03-23T02:05:53+5:30
मी ज्या समाज आणि जातीतून पुढे आले. त्या समाज आणि जातीला राजकारणाच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या दावणीला बांधायचे नाही. समाजासाठी काम करण्याकरीता मी राजकारणात आले आहे.
कल्याण : मी ज्या समाज आणि जातीतून पुढे आले. त्या समाज आणि जातीला राजकारणाच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या दावणीला बांधायचे नाही. समाजासाठी काम करण्याकरीता मी राजकारणात आले आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. ग्रामीण विकास खाते हेच मला चांगले वाटते. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज आणि ग्रामीण भागातील आया-बहिणींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यासाठी मी ग्राम विकास खाते घेतले आहे, असा खुलासा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे रविवारी केला.
अखिल भारतीय वंजारी सेवा समितीच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पश्चिमेतील शारदा मंदिरात मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण, वंजारी समाजाचे नगरसेवक माहेन उगले, पदाधिकारी अर्जून डोमाडे आदी उपस्थित होते. मागच्या मेळाव्यास मुंडे आल्या असताना त्यांनी मी पुढल्या मेळाव्यास येईल, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून येईन, असे वक्तव्य केले होते, असे पवार यांनी भाषणात सांगितले. पवार यांच्या व्यक्तव्याला मुंडे यांनी खोडून काढीत आपण अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नव्हते. कोणाचेही वाक्य कोणाच्या तोंडी घालून काही तरी संभ्रम निर्माण करू नका, असा सल्ला मुंडे यांनी पवार यांना दिला.
मुंडे यांनी सांगितले, की त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर त्या राजकारणात आल्या. समाजाच्या सेवेसाठी राजकारणाची कास धरली आहे. ग्रामविकास खात्याद्वारे जल शिवार योजनेसाठी १० हजार कोटी रुपये निधी ठेवला आहे. या योजनेचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला गोपीनाथ गड असे नाव दिले आहे. ते आमचे प्रेरणास्थान आहे. भगवान गड हे आमचे देवस्थान आहे. त्यामुळे ही तुलना नाही. याविषयीची गैरसमाज नसावा असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.