केवळ सन्मान नकोत, आस्थेने विचारपूसही हवी! शहीद जवानांच्या कुटुंबियांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 03:42 IST2018-08-15T03:42:28+5:302018-08-15T03:42:53+5:30

केवळ सन्मान नकोत, आस्थेने विचारपूसही हवी! शहीद जवानांच्या कुटुंबियांची खंत
- प्रशांत माने
डोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली जात नाही. शहीद कॅप्टन विनय सच्चान यांचे वडील राजाबेटा सच्चान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला ही खंत व्यक्त केली.
मुळचे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील सच्चान कुटुंबिय १९९० पासून डोंबिवलीत वास्तव्याला आहेत. भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असलेल्या या कुटुंबातील २६ वर्षीय विनय यांना २४ मार्च २००३ रोजी जम्मु-काश्मीरातील राजौरी सेक्टरमधील सुरणकोट भागात दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावताना वीरमरण आले. कुटुंबातील अन्य कुणीही लष्करात नसले तरी, विनय यांना देशप्रेमाची कमालीची ओढ होती. यातूनच ११ जून १९९८ रोजी ते सैन्यदलात रूजू झाले. त्यांनी ५ मराठा लाइट इन्फ्रँ टपासून लष्करी सेवेला सुरूवात केली. १९९९ साली कारगिल युध्द सुरू असताना विनय डेहराडून येथे लेफ्टनंटचे ट्रेनिंग घेत होते. २००२ अखेरीस त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि मार्च २००३ मध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी त्यांचे वय अवघे २६ वर्षे होते.
या घटनेला १५ वर्षे उलटली असली तरी कॅप्टन विनय यांच्या स्मृती स्फूर्तीस्थळाच्या माध्यमातून आजही जपल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांचे वडील राजाबेटा आणि आई सुधा यांनी त्यांच्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. लष्करातील प्रत्येक सैनिकाचा सन्मान हा झालाच पाहिजे. तशीच देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचीही विचारपूस केली पाहिजे. सीमेवर लढणाऱ्या जवानांकडून आजही आमची खबरबात विचारली जाते. माझी मुलगी पल्लवी हिला भाऊ नाही; पण सैनिकांना राखी पाठवून तिने आपले बंधूप्रेम कायम ठेवल्याचे राजाबेटा यांनी सांगितले. कॅप्टन विनयच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले स्मारक हे प्रेरणादायी आहे. या स्फुर्तीस्थळाच्या उभारणीत दिवंगत नगरसेवक नंदू जोशी यांचे मोलाचे योगदान आहे. केडीएमसी प्रशासन आणि तत्कालीन पदाधिकाºयांचीही यासाठी चांगली मदत झाली होती. दरवर्षी २४ मार्च रोजी विनय यांच्या स्मृतीदिनी मुंबई सिध्दार्थ महाविद्यालयातील नेव्हल एनसीसी युनीटचे विद्यार्थी या स्फूर्तीस्थळावर मानवंदना देत असल्याचेही राजाबेटा यांनी यावेळी सांगितले.
घर सामाजिक उपक्रमासाठी देणार
डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात सच्चान कुटुंबाचे वास्तव्य असून, त्यांचे घर एक प्रकारचे स्मारक झाले आहे. विनयच्या आठवणी जतन करण्यासाठी आपल्या पश्चात हे घर सामाजिक उपक्रमांसाठी देण्याचा मानस या कुटुंबाने व्यक्त केला. एखादी लायब्ररी अथवा सैन्यदलाशी संबंधित उपक्रम या घरामध्ये सामान्य नागरीकांसाठी चालू करण्याचा विचार असल्याचे राजाबेटा यांनी सांगितले.