माहिती अधिकारांतर्गत तपशील घ्यायचाच नाही का? कार्यकर्ते संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:21 AM2018-03-10T06:21:09+5:302018-03-10T06:21:09+5:30
आरटीआय कार्यकर्त्यांना संशयित आणि ब्लॅकमेलर ठरवत ठाणे महापालिकेने सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याचे पडसाद शहरात उमटू लागले असून यापुढे पालिकेकडे माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.
ठाणे - आरटीआय कार्यकर्त्यांना संशयित आणि ब्लॅकमेलर ठरवत ठाणे महापालिकेने सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याचे पडसाद शहरात उमटू लागले असून यापुढे पालिकेकडे माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. महापालिकेच्या कारभारातील विसंगती उघड करीत असल्यानेच ही कारवाई होत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
वारंवार तक्रारी दाखल करणाºयांमध्ये काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा अहवाल पालिकेने पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. या व्यक्तींचे या अनियमित कृतीबाबत सविस्तर अहवाल संबंधीत विभागाने तयार केला आहे. त्या अनुषंगाने व्यक्ती व कामनिहाय माहिती तयार केली असून ती या पत्राबरोबर पालिकेने पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात काही व्यक्तींची एक साखळी कार्यरत असल्याचा निर्ष्कषदेखील काढला आहे. त्या अनुषंगाने या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पालिकेने केली आहे.
पालिकेने उचललेल्या या पावलामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आम्ही महापालिकेतील काही चुकीची कामे उघड केली म्हणूनच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महापालिकेच्या कारभारातील विसंगती दाखविणे हे चुकीचे असेल तर अशा प्रकारचे माहिती अधिकाराचे अर्ज टाकतच राहणार, असेही खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. संविधानाने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे. परंतु, पालिका या अधिकाराची अशा पद्धतीने गळचेपी करीत असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही या दडपशाहीला बळी पडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मी २०१४ मध्ये फाईल गहाळ झाल्याने एकच आरटीआय टाकला होता. त्यानंतर आजतागायत मी एकही अर्ज केलेला नाही. परंतु, संविधांनाने दिलेल्या अधिकाराची अशा पद्धतीने गळचेपी होत असेल तर आणखी पत्रव्यवहार केले जातील. वेळ पडल्यास पालिकेच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू.
- रामभाऊ तायडे, माजी नगरसेवक, ठामपा
महापालिकेच्या काही विभागात असलेली विसंगती दाखविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, आणि अशा प्रकारे जर आमच्याकडून ब्लॅकमेलिंग अथवा इतर कोणता प्रयत्न झाला असेल तर तशी तक्रार करणे योग्य आहे. परंतु, विसंगती दाखविल्यानेच हा सुड उगारण्याचा हा प्रयत्न आहे.
- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य, ठामपा
या संदर्भात पालिके कडून अद्याप लेखी स्वरुपात आम्हाला कोणतीचा माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही. परंतु, वेळ आल्यास वकिलांशी चर्चा करून कायदेशीर उत्तर दिले जाईल.
- संजय घाडीगांवकर, माजी नगरसेवक
पालिकेकडून याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. परंतु, माहिती अधिकारात माहिती विचारणे चुकीचे आहे का?
- सुधीर बर्गे, माहिती अधिकार कार्यकर्ते