नको कुबडी युतीची, करा तयारी भाजपा विजयाची
By admin | Published: January 13, 2017 06:50 AM2017-01-13T06:50:01+5:302017-01-13T06:50:15+5:30
प्रदेशपातळीवर युतीबाबत सकारात्मक वारे वाहू लागले असतानाच ठाण्यात मात्र भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या
ठाणे : प्रदेशपातळीवर युतीबाबत सकारात्मक वारे वाहू लागले असतानाच ठाण्यात मात्र भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या परिसरात लावलेल्या आम्ही ठाणेकरच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ठाण्यातील भाजपाच्या एका गटाने युती नको विकास हवा, ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवे, मोदी-फडणवीसांचा कारभार ठरला राज्यात नंबर वन, नको कुबडी युतीची करा तयारी एकहाती भाजपाच्या विजयाची, एकटे लढा ठाण्यातही व्हा नंबर वन, युती नाकारा, ठाण्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा, अशा आशयांचे बॅनर लावले होते. यातून ठाण्यातील भाजपाच्या एका गटाने युती नको, असाच संकेत दिल्याचे दिसले. परंतु, हे बॅनर कोणी लावले, याबाबत मात्र भाजपा नेत्यांनी कमालीची गुप्तता राखली.
ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा यापूर्वीच शहर भाजपाने दिला होता. निवडणुकीची आचारसंहिता लागताच शिवसेनेने दिलेल्या टाळीला होकार देऊन भाजपानेदेखील ठाणे, मुंबईतील युतीचा निर्णय घेण्याचे संकेत देत उर्वरित ठिकाणांचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी घेतील, असे जाहीर केले. त्यामुळे ठाण्यात आता युती होणार, हे जवळजवळ निश्चित मानले जात होते. परंतु, प्रदेशने घेतलेल्या या निर्णयावर स्थानिक पातळीवरील काही मंडळींनाही ही बॅनरबाजी करून श्रेष्ठींना द्यायचा तो संदेश दिला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार संजय केळकर यांनीदेखील स्वबळाचा नारा दिला होता.
दरम्यान, बुधवारी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आणि गुरुवारी ठाण्यात भाजपामध्ये पोस्टरयुद्ध सुरू झाले.
बॅनर कुणी लावले?
च्विशेष म्हणजे काळ्या रंगाच्या बॅनरखाली आम्ही ठाणेकर एवढेच लिहिण्यात आले होते. त्यामुळे ते नेमके लावले कोणी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला होता.
च्यासंदर्भात शहर भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ती एका समूहाची भावना आहे. जी त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे. परंतु, हे बॅनर कोणी लावले, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.