पाणीटंचाई नको रे बाबा! साखरोली गावाला प्रथमच बसली झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:23 AM2019-06-06T00:23:13+5:302019-06-06T00:23:23+5:30
या तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण झाल्यास या तलावातील पाणी अनेक गावांना संजीवनी ठरेल. मात्र, हे काम आता होणे शक्य नाही.
भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी काही गावे आहेत की, ज्या गावांना कधीच पाणीटंचाईचे चटके जाणवले नव्हते. मात्र, पाणीटंचाई काय असते, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होते, याची प्रचीती साखरोली ग्रामस्थांना आली आहे. त्यामुळे अशी टंचाई पुढील वर्षीपासून नको, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
डोंगराच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे साखरोली. सुमारे दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गाने परिपूर्ण असे. डोंगराच्या पलीकडे तानसा धरणाचा पाण्याचा साठा, तर गावासाठी असणारा तलावही दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी. या तलावात अनेक गावांची तहान भागेल इतके पाणी. या पाण्यावरच आटगाव, कानविंदे, पुनध्ये या ग्रामपंचायतींच्या गावांमधील ग्रामस्थांची तहान भागवण्याची क्षमता असणाऱ्या साखरोली गावच्या हद्दीत असलेला तलाव! मात्र, यावर्षी पावसाने लवकरच उघडीप दिल्याने तलावात येणारे ओहळ, लवकरच कोरडे झाले. तलावाची खोली कमी, मात्र अनेक वर्षांत गावामधील वाढलेली लोकसंख्या यामुळे पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे आज तलावातील पाणीपातळी खूपच खाली गेल्याने आता तलावाखाली असणाºया विहिरी भरण्यासाठी दोनदोन दिवसांचा कालावधी लागत असल्याने या गावाला तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तोही पुरेसा नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
या तलावाचे खोलीकरण व मजबुतीकरण झाल्यास या तलावातील पाणी अनेक गावांना संजीवनी ठरेल. मात्र, हे काम आता होणे शक्य नाही. कारण, काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे जर का पाऊस पुन्हा या वर्षी मुबलक प्रमाणात पडला नाही, तर मात्र या गावांना पुन्हा पुढील वर्षी पाणीटंचाईसारख्या बिकट समस्येला सामोरे जावे लागेल, हे मात्र नक्की.
कधी नव्हे ती पाणीटंचाई आमच्या गावात निर्माण झाल्याने मोठी पाणीसमस्या निर्माण झाली आहे. पुढील वर्षी ती होऊ नये. - संजय नलावडे, ग्रामस्थ
या गावातील ग्रामपंचायतींनी तलावाचे खोलीकरण, मजबुतीकरण यांचा ठराव दिल्यास त्यावर तत्काळ विचार होईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता