काळजी नको, खंडग्रास ग्रहणात बिनधास्त प्या मसाले दूध! खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणांचा निर्वाळा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 26, 2023 08:04 AM2023-10-26T08:04:37+5:302023-10-26T08:07:34+5:30
ग्रहणात हवा प्रदूषित असल्याने चंद्रग्रहणाच्या काळात कोजागिरी साजरी करायची की नाही, मसाला दूध प्यायचे की नाही, असे प्रश्न लोकांच्या मनात असतात.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येत्या शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून, ते संपूर्ण भारतातून दिसणार, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच ग्रहणासंबंधी प्राचीन काळापासून गैरसमजुती होत्या व आहेत. ग्रहणात हवा प्रदूषित असल्याने चंद्रग्रहणाच्या काळात कोजागिरी साजरी करायची की नाही, मसाला दूध प्यायचे की नाही, असे गैरसमज लोकांच्या मनात असतात. परंतु लोकांनी चंद्रग्रहण काळात अगदी आनंदाने दूध प्यावे, असा निर्वाळा खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिला.
याविषयी अधिक माहिती सांगताना सोमण म्हणाले की, येत्या शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी सहा टक्के चंद्रबिंब ग्रासीत दिसेल. चंद्रग्रहण उत्तररात्री २ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी सर्वांना पाहता येईल. हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप आणि आफ्रिका या देशांतूनही दिसेल, असे सोमण यांनी सांगितले. यापूर्वी १९८६ मध्ये कोजागरीच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण दिसले होते. २०२४ मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. यानंतर ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. ग्रहण काळाबद्दल असणाऱ्या गैरसमजाबद्दल माहिती देताना त्यांनी अनेक शंकांचे निरसन केले.
ग्रहण काळात हवा प्रदूषित होते, असा गैरसमज आहे. त्यामुळे अनेक जण ग्रहण काळात अन्न सेवन करीत नाही. मग कोजागरी साजरी करायची की नाही, असा प्रश्न काहींना पडतो. अनेक सोसायट्यांमध्ये कोजागरीनिमित्त जेवण व मसाला दूध सेवनाचे कार्यक्रम ठेवायचे असतात. योगायोगाने कोजागरीला शनिवार आला आहे. परंतु, चंद्रग्रहणात कोजागरी साजरी करण्यात कुठलीही अडचण नाही, असे सोमण म्हणाले.
...तो श्रद्धेचा विषय झाला
ग्रहणात गरोदर स्त्रीने भाजी चिरली तर व्यंग असलेले मूल जन्माला येते, हाही एक गैरसमज होता. उलट ‘थायलिडोमाईड’ नावाचे चुकीचे औषध युरोपमध्ये अनेक गरोदर महिलांनी घेतल्यामुळे विकृत मुले जन्माला आली होती. ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळायचे की नाही, हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे. इकडे भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरीत्या उतरविले. आपण या दिवशी चंद्रग्रहण पाहून ग्रहण कसे होते? चंद्र पृथ्वीच्या छायेत कसा येतो, हे तरी समजून घ्यायला पाहिजे, असे सोमण म्हणाले.