मोदींसाठी कर्ज घ्यायचे का?, राज ठाकरे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:08 AM2018-05-04T02:08:59+5:302018-05-04T02:08:59+5:30
केंद्र सरकार सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे बांधत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प महाराष्टÑ तसेच देशालाही उपयोगाचे नाहीत.
शहापूर : केंद्र सरकार सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे बांधत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प महाराष्टÑ तसेच देशालाही उपयोगाचे नाहीत. मग, काय एकट्या नरेंद्र मोदींसाठी कर्ज डोक्यावर घ्यायचे का, असा सवाल महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. गुरुवारी शहापूर दौऱ्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांनी पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांत मंगळवारपासून दौरा सुरू केला. बुधवारी ते शहापुरात होते. मनसेचे तालुकाध्यक्ष जयवंत मांजे यांच्या नेतृत्वाखाली बाइक रॅली काढून मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रॅली बाजारपेठेत आल्यानंतर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, पंचायत समितीजवळील शिवस्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला.
तसेच शासकीय विश्रामधाम येथे ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी शिवसेना आणि भाजपाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. कोणताही प्रकल्प आला की, आधी त्याला विरोध करायचा.
विरोध झाला की, त्या प्रकल्पाची किंमत आपोआप वाढते. मग, तेथे राजकीय लोकांची दलाली सुरू होते. या प्रकल्पासाठी जमीन देण्यास एखादाच शेतकरी गेला की, त्याला कमी मोबदला दिला जातो.
मात्र, तीच जमीन मग राजकीय दलालामार्फत दिल्यास तिला जास्त मोबदला मिळतो. अशा प्रकारे राजकीय दलाली करून पैसे कमवायचे, पैसा आला की सत्ता मिळवायची आणि सत्ता आल्यानंतर पुन्हा पैसे कमवायचे, असाच सारा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. तर, रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत अजूनही निश्चित भूमिका घेता येत नसल्याबद्दल त्यांनी शिवसेनेवर टीका केली.