डॉक्टरअभावी १०८ रुग्णवाहिकेची सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:14 AM2018-02-23T02:14:26+5:302018-02-23T02:14:28+5:30
शासनाने गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा मिळावी यासाठी ‘रुग्णालय तेथे १०८’ ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली.
मुरबाड : शासनाने गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा मिळावी यासाठी ‘रुग्णालय तेथे १०८’ ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. मात्र दोन महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने ही सेवा ठप्प झाली आहे. परिणामी, खाजगी वाहनांचे चांगलेच फावले आहे.
ही सेवा सुरू झाल्याने गर्भवती असो अथवा अपघातग्रस्त त्यांना असेल तेथून तात्काळ हव्या त्या रुग्णालयात पोहोचवले जाते. शिवाय या रुग्णवाहिकेत चालकासोबत तज्ज्ञ डॉक्टर असल्याने हजारो महिलांची प्रसूती सुखरूप झाली. तर शेकडो अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. यामुळे १०८ ही सेवा संजीवनी ठरली असताना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात
टोकावडे हा अतिदुर्गम भाग कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने महामार्गावरील अपघात तसेच, सर्पदंश, विंचूदंश, गर्भवतींना योग्य आणि तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालय सुरू केले. एखादा रु ग्ण सिरीयस असेल आणि त्याच्यावर टोकावडे येथे उपचार करणे अशक्य असेल, तर पुढील उपचारांसाठी ताबडतोब रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने सुरू केलेली १०८ ही सुसज्ज अशी एक चालक आणि सोबतीला तज्ज्ञ डॉक्टर अशी रुग्णवाहिका टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिली. मात्र, दोन महिन्यांपासून रुग्णवाहिका आहे, डॉक्टर नाही. अशी परिस्थिती असल्याने कल्याण - नगर महामार्गावर होणारे अपघात, गर्भवतींना ताबडतोब सेवा मिळत नाही. एखादी अपघातग्रस्त किंवा प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर टोकावडे येथे उपचार होत नसतील तर उल्हासनगर किंवा जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी ३० किमी अंतरावरील मुरबाड अथवा किन्हवली येथून १०८ ही रुग्णवाहिका मागवावी लागते. मात्र, यामुळे विलंब होत असल्याने रु ग्ण दगावण्याची शक्यता असते, किंवा खाजगी वाहनाची सोय करावी लागते. परंतु, सर्वसामान्य माणसाला खाजगी रुग्णवाहिकेचा खर्च परवडणारा नसल्याने कधी कधी जीवावर बेतण्याची शक्यता असते.