म्हसा आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:09+5:302021-06-21T04:26:09+5:30
मुरबाड : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश असले, तरी म्हसा आरोग्य केंद्रातील दोन्ही डाॅक्टर उपस्थित राहत ...
मुरबाड : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश असले, तरी म्हसा आरोग्य केंद्रातील दोन्ही डाॅक्टर उपस्थित राहत नसल्याने उलटी, जुलाबाचे व श्वान दंश असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील सासणे, नारिवली, देवळे, जांभुर्डे, पाटगाव, मोरोशी, शिरोशी, न्याहाडी तसेच माळशेज घाटात पायथ्याशी असलेल्या आरोग्य केंद्राची दारे उघडण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे, अशा परिस्थितीत म्हसा आरोग्य केंद्रातील डॉ. होनराव पाटील हे मुरबाड येथे तर डॉ. संजय पवार हे नाशिक येथे वास्तव्य करीत असल्याने ते आपल्या सवडीनुसार आरोग्य केंद्रात उपस्थित राहतात. रात्री प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला तसेच उलटी, जुलाब व श्वान, विंचू दंश झालेल्या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते.
----------------------------------------------------------------
आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मुख्यालयात वास्तव्य करण्याचे आदेश असतानाही ते मुख्यालयात वास्तव्य करत नसतील व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असेल तर याची वेळीच दखल घेतली जाईल व नागरिकांना तातडीची सेवा दिली जाईल.
- डॉ. मनीष रेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी