भिवंडीत गुंगीचे औषध देऊन तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:27 AM2020-02-27T00:27:09+5:302020-02-27T00:27:16+5:30
गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरु
भिवंडी : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच एका २७ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात डॉ. रामकुंवर यादव (रा. कल्याण पूर्व, नांदिवली ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आरोपीचा शोध सुरु आहे.
पीडित तरु णीच्या आईवडिलांचे निधन झाल्याने ती कल्याण पूर्वेत मावशीकडे राहते. मॉलमध्ये कामावर असताना साठवलेल्या रकमेतून ती स्वत:साठी घर शोधत होती. काही दिवसांपूर्वी तिची मावशी तिला बांधकाम व्यावसायिक असलेल्या डॉ. रामकुंवर याच्या कल्याण पूर्वेतील कार्यालयात घेऊन गेली होती. त्यावेळी मावशीने आरोपीला पीडितेची हकीकत सांगितल्यानंतर तो तिला स्वत:ची रूम देण्यासाठी तयार झाला. त्याने पीडित तरु णीचा मोबाइल नंबर घेऊन तुला लवकरच रूम दाखवतो, असे म्हणून तिचे आधारकार्डही घेतले. आठवडाभरानंतर त्याने तरुणीशी मोबाइलवर संपर्क करून रूम दाखवण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी त्याच्या कारमध्ये तिला घेऊन गेला. भिवंडी तालुक्याच्या हद्दीत नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगत तो मुंबई-नाशिक महामार्गावर तिला घेऊन आला. दुपारच्या जेवणाची वेळ झाल्याचे सांगून त्याने एका ढाब्यावर कार थांबवली. तिथे डॉ. रामकुंवर, त्याचा एक साथीदार आणि पीडित तरु णीने जेवण केले. जेवणानंतर आरोपीने रबडीची आॅर्डर दिली. मधुमेहाचा त्रास असल्याचे सांगत आरोपी आणि त्याच्या साथीदाराने ती खाल्ली नाही. पीडितेने रबडी खाल्ल्यानंतर चक्कर येऊ लागल्याचे तिने आरोपीला सांगितले. आरोपीने तिला आराम करण्याच्या बहाण्याने ढाब्याशेजारी असलेल्या लॉजवर नेले. तिथे पाणी पिऊन तरुणी बेशुद्ध होताच डॉ. रामकुंवर याने बलात्कार केला.
ठार मारण्याची धमकी
आरोपीने ठार मारण्याची धमकी देत, फुकट रूम देण्याचे आमिषही तरुणीला दाखवले. तरु णीने हा प्रकार मावशीला सांगताच, त्यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल केला. एपीआय दीपक भोई हे तपास करीत आहेत.