महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निकाल
By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2024 21:13 IST2024-12-19T21:13:20+5:302024-12-19T21:13:29+5:30
Thane News: कळव्यातील महापालिकेच्या एका रुग्णालयात महिला डॉक्टरांचा विनयभंग करुन त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या प्राध्यापक तथा डॉक्टर शैलेश्वर नटराजन (६३) याला ठाणे न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्हयात तीन वर्षे सक्त मजूरी आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निकाल
- जितेंद्र कालेकर
ठाणे - कळव्यातील महापालिकेच्या एका रुग्णालयात महिला डॉक्टरांचा विनयभंग करुन त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या प्राध्यापक तथा डॉक्टर शैलेश्वर नटराजन (६३) याला ठाणेन्यायालयाने विनयभंगाच्या गुन्हयात तीन वर्षे सक्त मजूरी आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर अश्लील शेरेबाजी प्रकरणी एक वर्षे साधी कैद आणि १५ हजारांच्या दंडाची शिक्षाही सुनावली आहे.
यातील आरोपी डॉ. नटराजन हा राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा याठिकाणी प्राध्यापक व शल्य चिकित्सा विभागाचा प्रमुख होता. त्यावेळी त्याने एमबीबीएसच्या महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणार्थी मुलींचा विनयभंग करुन त्यांच्याशी जवळीक साधत त्यांची लैंगिक सतावणूक केल्याचा आराेप आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १७ महिला डॉक्टरांनी विनयभंगासह अश्लील शेरेबाजी केल्याचा अनुक्रमे ३५४ आणि ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी डॉक्टरला त्यावेळी अटकही झाली होती. त्याच्यावर कारवाईसाठी डॉक्टरांनी मोर्चा आणि निदर्शनेही केली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. न्या. मोहिनी ननावरे यांच्या न्यायालयात याप्रकरणी १९ डिसेंबर २०२४ रोजी सुनावणी झाली.
तत्कालीन पोलिस निरीक्षक मुरलीधर कारकर (निवृत्त सहायक पोलिस आयुक्त, मुंबई) यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकारी अभियोक्ता लीना पेडणेकर यांनी आरोपीच्या शिक्षेसाठी जोरदार बाजू मांडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डी. एच. जाधव यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व साक्षी पुरावे पडताळल्यानंतर आरोपीला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.