अंबरनाथ, बदलापूरमध्येही डॉक्टरांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:03 AM2019-06-18T00:03:41+5:302019-06-18T00:03:55+5:30
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी डॉक्टरांचे शासनाला निवेदन
अंबरनाथ/बदलापूर : पश्चिम बंगाल येथे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या विरोधात आॅल इंडिया मेडिकल असोसिएशनने सोमवारी बंद पुकारला होता. या बंदमध्ये अंबरनाथ मेडिकल असोसिएशनही सहभागी झाले होते. अंबरनाथमधील डॉक्टर संघटनेने तहसीलदार जयराज देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनाही पत्र देऊन आपला निषेध व्यक्त केला.
अंबरनाथ मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. उषा महेश्वरी, डॉ. राकेश पटेल, यतीन भिसे, गौतम जटाले यांच्यासह शहरातील अनेक बडे डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी शांततेत आंदोलन करीत तहसीलदारांना निषेध व्यक्त करणारे पत्र दिले आहे. या बंद दरम्यान काही रुग्णालयात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आली होती. जेणेकरुन रुग्णांच्या जिवावर हे आंदोलन बेतणार नाही.
अशाच प्रकारचे आंदोलन बदलापूरातील डॉक्टरांनीही केले. बदलापूरातील डॉक्टरांनी तहसिलदारांना आपल्या निषेधाचे पत्र दिले. तसेच सांकाळी ६ वाजता डॉक्टरांनी आंबेडकर चौक ते गांधी चौक पर्यंत मूक मोर्चा आयोजित केला होता.
भिवंडी : पश्चिम बंगाल येथे सरकारी रूग्णालयांत रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याचा निषेध करण्याच्या हेतूने सोमवारी सकाळी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध सभा घेऊन डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना देण्यात आले.
इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील शंभर हॉस्पिटल मधील बाह्यरूग्ण विभाग बंद ठेऊन आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या होत्या. तसेच निषेध सभा घेऊन शासनाने डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करावी, हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करावा, शिकाऊ डॉक्टर काम करीत असलेल्या ठिकाणी संरक्षण देण्याची व्यवस्था करावी,अशा विविध मागण्यांचे निवेदन तयार करून ते डॉक्टरांनी सामुहीकरित्या उपविभागीय कार्यालयांत जाऊन प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांना दिले.