कोविड रुग्णालयात डॉक्टर, औषधांची भासतेय कमतरता, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा भाजपचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:42 AM2021-05-13T11:42:06+5:302021-05-13T11:45:30+5:30
या ठिकाणी उपचार घेत असलेल्या सरोज बारोट यांनी सांगितले की, येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय लक्ष देत नाहीत.
नालासोपारा : वसई-विरार महापालिका कोविड रुग्णालयात कोरोना रुग्णांना उत्तम सुविधा देत असल्याचा दावा मनपा करीत आहे. मात्र कोविड रुग्णालयात डॉक्टरांसह औषधांची कमतरता भासू लागली आहे. इथे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. महापालिकेचा आरोग्य विभाग रुग्णांच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
वसईच्या पूर्वेकडील वरुण इंडस्ट्रीजमध्ये बनलेल्या १२०० बेडच्या कोविड रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्वतः या कोविड रुग्णालयात रुग्णांची विचारपूस आणि सोयी-सुविधा मिळतात की नाही हे पाहण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी फक्त दोनच डॉक्टर कोविड रुग्णालयात उपस्थित होते. त्यांनी रुग्णांकडे विचारपूस केली असता, मागील १५ दिवसांपासून या रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी फक्त दोनच डॉक्टर येत असून देखभालीसाठी ८ ते १० परिचारिका उपस्थित असतात. ६०० ते ७०० कोरोना रुग्णांचे आरोग्य त्यांच्याच भरवशावर अवलंबून आहे.
या ठिकाणी उपचार घेत असलेल्या सरोज बारोट यांनी सांगितले की, येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय लक्ष देत नाहीत. रुग्णांना स्वतःचे काम स्वतः करावे लागते. यामुळे घरीच उपचार घेतले असते तर बरे झाले असते. या ठिकाणी जनावरांसारखे कोरोना रुग्णांचे हाल होत असल्याचे उपचार घेत असलेले अशोक सुराणा यांनी सांगितले.
पाच डाॅक्टर कार्यरत
वसईच्या पूर्वेकडील वरुण इंडस्ट्रीजमध्ये सुरू असलेल्या या कोविड रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर विनय सालपुरे यांच्याशी या सर्व महितीबाबत संपर्क साधला असता त्यांनी या रुग्णालयात पाच डॉक्टर आणि २० परिचारिका काम करत असल्याचे सांगितले.