ग्रामीण भागात जाण्यास डॉक्टरांची नकारघंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:26 AM2021-06-20T04:26:56+5:302021-06-20T04:26:56+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र, ग्रामीण भागात असलेली सार्वजनिक वाहतुकीची कमतरता, शहरी आणि ग्रामीण भागात डॉक्टरांच्या वेतनात तफावत यामुळे डॉक्टर मिळत नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. कोरोना काळात ग्रामीण भागासाठी एमबीबीएस आणि बीएमएस आशा १६ डॉक्टरांना नियुक्तिपत्रे दिली होती. यापैकी केवळ सहाच डॉक्टर कर्तव्यावर हजर झाले आहेत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. अचानकपणे आलेल्या या महामारीने आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली होती. ती सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली. त्यातच नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याची बाब सदस्यांनी उघडकीस आणली. जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनीदेखील ग्रामीण भागात डॉक्टर येण्यास तयार नसल्याचे स्पष्ट केले.
कोरोनाच्या काळात शहापूर, मुरबाड आणि कल्याण वरप येथील ग्रामीण भागासाठी एमबीबीएस आणि बीएमएस अशा १६ डॉक्टरांना नियुक्तिपत्रे दिली होती. त्यापैकी केवळ सहाच डॉक्टर कर्तव्यावर हजर झाले आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यासाठी तीन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली. त्यापैकी केवळ एकच डॉक्टर हजर झाला. तर सहा बीएमएस डॉक्टरांपैकी तीन डॉक्टर कर्तव्य बजावित आहेत. शहापूर तालुक्यासाठी एका एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली. मात्र, तो हजर झाला नाही. तर तीन बीएमएस डॉक्टरांपैकी एकच डॉक्टर कर्तव्य बजावित आहे. कल्याणच्या वरप येथे एक एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली. तेही हजर झाले नाहीत. तर, बीएमएस दोन डॉक्टरांपैकी केवळ एक डॉक्टर कर्तव्य बजावित असल्याची बाब समोर आली आहे.
वेतन तफावत, सार्वजनिक वाहतूक अभाव
ठाणे जिल्ह्यातील अतिम दुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनाकडून डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या वेतनातील तफावत यामुळे ग्रामीण भागात डॉक्टर काम करण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.