डॉक्टरांनी माणूस बनावे : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे कल्याणमध्ये आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:17 PM2018-03-11T18:17:01+5:302018-03-11T18:17:01+5:30
पूर्वी डॉक्टरांना देव मानत असत. मात्र, आता डॉक्टरांना देव मानण्याचा काळ गेला. आता डॉक्टरांविषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. ते दूर करण्यासाठी आधी डॉक्टरांनी माणूस बनून रुग्णाकडे बघावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. कल्याणमधील वायले नगर परिसरातील 'श्वास' या खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्याण : पूर्वी डॉक्टरांना देव मानत असत. मात्र, आता डॉक्टरांना देव मानण्याचा काळ गेला. आता डॉक्टरांविषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. ते दूर करण्यासाठी आधी डॉक्टरांनी माणूस बनून रुग्णाकडे बघावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. कल्याणमधील वायले नगर परिसरातील 'श्वास' या खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे खासदार कपिल पाटील उपस्थित होते.
व्यवसाय म्हणून डॉक्टरी पेशाकडे बघणाऱ्या डॉक्टरांचे डॉ. भामरे यांनी चांगलेच कान टोचले. धंदा म्हणून या पेशाकडे बघू नका. डॉक्टरांनी रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने काम करावे. सध्या आजारी पडणे म्हणजे खूप खर्चिक काम झाले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळी सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्यसेवेला मुकावे लागते. चांगली वैद्यकीय सेवा व सुविधा ही समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोचविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. त्याबाबत लवकरच केंद्र सरकारकडून आरोग्य योजना आणणार आहे, अशी माहिती डॉ. भामरे यांनी दिली. खासदार कपिल पाटील यांची मुक्तकंठाने स्तुती करताना मित्र असावा, तर कपिल पाटील यांच्यासारखा, असे कौतूकही त्यांनी केले.
रुग्णालय हे कत्तलखाना होऊ नये, अशी अपेक्षा खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. सुभाष भामरे यांचा आदर्श घेऊन समाजसेवा म्हणून डॉक्टरांनी व्यवसाय करावा, असा सल्ला त्यांनी दिला. कल्याण शहरातील नागरीक आजारीच पडू नयेत. मात्र, पडल्यास या रुग्णालयाच्या माध्यमातून आजारी रुग्णांना लवकरात लवकर चांगले उपचार मिळून ते ठणठणीत बरे होतील, असा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड, महापालिकेतील भाजपचे गटनेते वरुण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.