लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:46 AM2018-12-29T02:46:16+5:302018-12-29T02:46:43+5:30
ठाणे शासनाचे लोककला कलाकारांकडे लक्ष नाही. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटल्यानंतरही या कलाकारांच्या उपजीविकेचे साधन कमी होत चाललेले आहे.
ठाणे : शासनाचे लोककला कलाकारांकडे लक्ष नाही. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटल्यानंतरही या कलाकारांच्या उपजीविकेचे साधन कमी होत चाललेले आहे. म्हणूनच, लोककलेचा अस्त होत आहे. लोककलेला व्यासपीठ मिळत नाही, अशी खंत व्यक्त करून लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक सदानंद राणे यांनी लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर ‘लोकगंगा आपुल्या दारी’ या विषयावर राणे यांचे व्याख्यान ध्वनिचित्रफितीसह आयोजित केले होते. यावेळी ते म्हणाले की, भारत हा देश सर्वगुणसंपन्न आहे. समृद्धी, संस्कृती, लोककला, लोकनृत्य, परंपरा या सर्व गोष्टी आपल्या देशात आहेत. लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे, असे शासनाला सांगितले आहे. किमान, महाराष्ट्रातील लोककला, लोकनृत्याचे डॉक्युमेंटेशन करावे, जेणेकरून याची माहिती तरुण पिढीला होईल. लोककला, लोकनृत्य हे दोन वेगळे भाग आहेत. परंपरेनुसार लोकनृत्य पहिले आहे. पाच हजार वर्षांपासून लोकनृत्य परंपरा आहे. आदिवासी समाजाने ही परंपरा उचलली. त्यांच्या कामातून, श्रमातून निरनिराळ्या गोष्टी येऊ लागल्या. अवजारांतून गाणी निर्माण केली. प्रत्येक जमात त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय करत आली, त्या व्यवसायातील अॅक्शन नृत्यात येत गेल्या. प्रत्येक जिल्ह्याच्या लोकनृत्यात फरक आहे. लोककला जोपासणे कठीण आहे. कला चालली पाहिजे, घरही चालले पाहिजे, याचा मेळ घालणे कठीण आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील लोकनृत्य दाखवून त्याची त्यांनी माहिती दिली. यात बोहाडा, पश्चिम महाराष्ट्राचे डहाका, भारूड, नागपूरमधील खडी गंमत, कोकणातील नमन, आदिवासींचे उरण तालुक्यातील डेंगा नृत्य, सांगली जिल्ह्यातील धनगर नृत्य, गोव्याचे तिक्री नृत्य, गुजरातमधील राठवा नृत्य, महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर केले जाणारे डांगी नृत्य, राजस्थानचे तेरह ताली अशा विविध लोकनृत्यांची त्यांनी प्रेक्षकांना मनोरंजक माहिती दिली.
विदेशी मंडळी भारताची लोकलला शिकून त्यांच्या देशात शिकवतात. त्यांना भारतीय लोककलेचे प्रचंड आकर्षण आहे. आपले लोक मात्र याबाबत उदासीन आहेत, अशी नाराजी सदानंद राणे यांनी व्यक्त केली.