कोणी लस देता का लस ? दुसरा डाेस मिळणेही दुरापास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:30 PM2021-05-03T23:30:31+5:302021-05-03T23:30:54+5:30
लसींचा ठाणे जिल्ह्यात तुटवडा : दुसरा डाेस मिळणेही दुरापास्त
अजित मांडके
ठाणे : केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहता मागील दोन दिवसांत १८ ते ४४ या वयोगटातील केवळ तीन हजार १४७ जणांचेच लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वयोगटातील हेच नागरिक असतानाही केवळ लसींच्या तुटवड्यामुळे त्यांना लस घेता येत नाही. त्यामुळे कोणाला पहिला तर कुणाला दुसरा डोस मिळणे आता दुरापास्त झाले आहे. जिल्ह्याला लसींचा जेमतेम साठा मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणची केंद्रे बंद आहेत.
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणचे लसीकरण केंद्र बंद, तर काही ठिकाणी अवघ्या दोन तासांसाठी जो साठा शिल्लक आहे, त्यातून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जात आहे. ठाणे शहरात अशीच स्थिती आहे. त्यामुळे ४५ वयोगटातील पुढील नागरिकांचा दुसरा डोस असला तरी त्यांना लसीकरण केंद्र गाठता येत नाही. केंद्रांवर लसी नसल्यानेच कुणी लस देता लस, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तर यात ज्येष्ठांचे हाल सुरू झाले आहेत. त्यांनादेखील आता लस मिळवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
ठाण्यात ५६ केंद्रांवर काही दिवसांपूर्वी लसीकरण सुरू होते. परंतु, लसींचा साठाच उपलब्ध न झाल्याने सोमवारी केवळ एकच केंद्र सुरू होते. आतापर्यंत जिल्ह्यात १२ लाख ३४ हजार ५६६ जणांचे लसीकरण झाले असून, अद्यापही ८० टक्के लसीकरण शिल्लक आहे. परंतु, लसींचा साठाच उपलब्ध झाला नाही तर लसीकरणाला दोन वर्षेदेखील कमी पडतील, अशी परिस्थिती सध्या आहे.
कोणी काय करायचे?
n१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झालेले आहे. त्यानुसार लसीकरणासाठी ऑनलाइन स्लॉट बुक करावा लागत आहे. परंतु, केवळ पहिला मेसेज आला असेल तर केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन करून तारखेचा दुसरा स्लॉट बुक झाल्यानंतरच केंद्रावर यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
n४५ वर्षांपुढील नागरिकांनी ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घेण्यासाठी घाई करू नये, लसींचा तुटवडा असल्याने लस जशा उपलब्ध होतील, त्यानुसार आता केंद्रांची यादी पाहूनच त्या ठिकाणी जाऊन टोकन घेऊन लस घ्यावी.
मी पहिला डोस घेतला आहे. आता मला दुसरा डोस घ्यायचा होता. परंतु, दिलेली तारीख निघून गेलेली असून, अद्यापही डोस मिळालेला नाही. लस घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावून केवळ काही जणांनाच टोकन दिले जात असल्याने परत घरी यावे लागत आहे. त्यामुळे दुसरा डोस केव्हा मिळणार, असा प्रश्न सतावत आहे.
- रामचंद्र जाधव, ज्येष्ठ नागरिक
जिल्हा प्रशासनाच्या वतीने लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. लसींचा साठा जसा उपलब्ध होत आहे, त्यानुसार त्याचे नियोजन करण्याचे प्रयोजन आमच्या पातळीवर सुरू आहे. लसींचा
साठा जास्त प्रमाणात उपलब्ध झाला तर त्यासाठीदेखील लसीकरण केंद्र वाढवून
लस देण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे
मी ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यानुसार मला तारखेचा मेसेजदेखील आला आहे. परंतु. सोमवारी शहरातील सर्वच केंद्रे बंद होती. त्यामुळे मला लस घेता आली नाही. हा भाेंगळ कारभार आहे.
- मिलिंद गायकवाड, नागरिक
मी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यानुसार लस घेण्यासाठी मी गेलो होतो. परंतु, लसींचा तुटवडा असल्याने मला ती घेता आली नाही. संबंधित केंद्रावर जेवढा लसींचा साठा असेल तेवढ्याच नागरिकांना
आत घेतल्याने मला परत यावे लागले आहे.
- विशाल कांबळे, नागरिक