राजा आताच चुकायला लागला का? आधीचे बरोबर होते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:18 AM2018-02-20T01:18:16+5:302018-02-20T01:18:19+5:30
राजा आताच चुकायला लागला का? आधीचे सारे राजे बरोबर होते का, असा प्रश्न विचारला आहे.
डोंबिवली : बडोद्यातील साहित्य संमेलनात लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाध्यक्षपदाचे विचार मांडताना ‘राजा तू चुकत आहेस, सुधारलं पाहिजे’ या घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटू लागले असून डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी राजा आताच चुकायला लागला का? आधीचे सारे राजे बरोबर होते का, असा प्रश्न विचारला आहे. गेल्या तीन वर्षातील राजवटीला शिव्या घालून धन्यता मिळवायची आणि त्यांच्याचकडे देणग्या मागायच्या हा काय प्रकार आहे, असा मुद्दाही त्यांनी मांडला. राजा चुकतो आहे, हे सांगणाºयांना साहित्यिक म्हणायचे का, अशी भूमिका त्यांनी घेतली.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळांतर्फे देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार यंदा शेवडे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शेवडे यांनी पुरस्काराच्या रकमेत स्वत:च्या दहा हजार रूपयांची भर घालून २१ हजारांचा धनादेश शाळेच्या इमारतीस अर्थसहाय्य म्हणून संस्थेकडे सुपूर्द केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा शुभदा जोशी, कार्यवाह महेश ठाकूर, कार्याध्यक्षा सविता टांकसाळे, आशीर्वाद बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजा तू चुकला असे बोलणारे सगळे साहित्यिक बरोबर आहेत का? राजा काय तीन वर्षात चुकू लागला आहे का? या आधीचे सगळे राजे बरोबर होते का? राजवट वेगळी आली, हे तुमच्या पोटात दुखतेय का? ती जाणीव तुम्ही व्यक्त करीत आहात. मग तुम्हाला तरी साहित्यिक म्हणायचे का, असा प्रश्न पडतो. ठराविक विचारसरणीच्या लोकांना नावे ठेवायची, पुरस्कारवापसीची लाट येते. ते परत करण्याची नाटक करायची. सरकारने एनजीओ बंद केल्या. सरकारी पातळीवर व्याख्याने द्यायला बोलावले नाही, म्हणून उत्पन्न थांबले आणि सरकार असहिष्णु ठरले, अशी कारणे यामागे असल्याचा आरोप शेवडे यांनी केला.
साहित्य संमेलनाचे नियंत्रण मला कधीही आलेले नाही. कदाचित माझी विचारसरणी त्याला कारणीभूत असेल, असे सांगत टीका करायची आणि त्यानंतरही देणगी वाढवून मागायची, या वृत्तीवर त्यांनी टीका केली. मराठी भााषेवर काय वेळ आली आहे, असे ते म्हणाले. सरकारच्या वाईट गोष्टीवर टीका करा, पण माध्यमांमध्ये चर्चेचे विषय ठरवावेत, म्हणून बोल्ड बोलू नका, असा सल्ला शेवडे यांनी टीकाकारांना दिला.
सावरकरांनी कधीही ब्रिटीश सरकारची माफी मागितली नाही. अनंत यातना सोसून सावरकर जिवंतपणे अंदमानातून सुटले, हीच खरी कम्युनिस्टांची पोटदुखी होती. सावरकरांना दुर्लक्षित ठेवण्यामागेही विचारसरणी कारणीभूत आहे. त्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. मी सावरकरप्रेमी आहे. भक्त नाही. कारण भक्त हा आंधळा असतो. इंग्लंडमधील सुभाषचंद्र बोस, डॉ. आंबडेकर याची घरे सरकारने ताब्यात घेतली. मात्र सावरकरांच्या इंडिया हाऊसकडे दुर्लक्ष केले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.