उल्हासनगरात पिसाळलेल्या कुत्र्याचा ६ जणांना चावा, मुलांची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 03:25 PM2018-02-02T15:25:37+5:302018-02-02T18:47:59+5:30
शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात २ वर्षाचा कुणाल निकम गंभीर जखमी झाला.
उल्हासनगर- शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात २ वर्षाचा कुणाल निकम गंभीर जखमी झाला. मुंबईतील केईएम रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून मृत्यूशी झुंज देत आहे. संतप्त नागरिकांनी कुत्र्याला मारून टाकले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, हिललाईल पोलिस ठाण्याच्या मागे कुणाल विनोद निकम आई-वडिलांसह राहतो. गुरूवारी दुपारी पिसाळलेला कुत्र्याने घरा समोर उभा असलेल्या कुणालवर अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या चावेने कुणाल गंभीर जखंमी झाला असून त्याला प्रथम शहरातील खाजगी रूग्णालयासह मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तब्येत गंभीर झाल्याने, मुंबईतील सायन रूग्णालयात हलविण्यात आले. सायन येथे रेबीज उपचाराची सोय नसल्याने, तेथून केईएम रूग्णालात नेले. बेशुध्द अवस्थेत असलेल्या कुणालवर उपचार सुरू असून तो मुत्यूशी झुंज देत आहे. याप्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने कुणाल निकम यांच्यासह ६ जणांना चावा घेतल्याचे उघड झाले. परिसरातील संतप्त नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला मारून टाकले. कुत्र्याचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागातून सांगण्यात आली. महापालिका वैघकिय अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनी एका वर्षापुर्वी २ हजारा पेक्षा जास्त श्वानाची नसबंदी केल्याची माहिती दिली. तसेच रेबिजचे इंजेक्शन महापालिका मध्यवर्ती रूग्णालयासह आरोग्य केंद्र व नागरिकांना देते असल्याचे ते म्हणाले. मात्र कुत्र्याची संख्येवर महापालिकेने नियंत्रण मिळविली नसल्याची टिका शहरातून होत आहे.