लाकडी बॅटने श्वानाला बेदम मारहाण, उपचारा दरम्यान श्वानाचा मृत्यू; गुन्हा दाखल
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 21, 2024 06:36 PM2024-09-21T18:36:36+5:302024-09-21T18:37:18+5:30
या प्रकरणी गोकुळ थोरे या आरोपी विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ठाणे : घोडबंदर रोड येथील मोघरपाडा येथे राहणाऱ्या गोकुळ थोरे या इसमाने एका भटक्या श्वानाच्या डोक्यात लाकडी बॅटने बेदम मारहाण करुन त्याला ठार केले. या प्रकरणी गोकुळ थोरे या आरोपी विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सोनाली वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. आरोपी गोकुळ थोरे, ३५ वर्षे, याने कोणतेही कारण नसताना श्वानाला (फिटक चॉकलेटी रंगांचा, नर जातीचा) गुरूवारी सायं. ७.३० वाजण्याच्या सुमारास मोघरपाडा येथे बॅटने बेदम मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले. या श्वानाला विविध पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३२५ (प्राण्याला मारून किंवा अपंग करणे) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या गुन्ह्यासंदर्भात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, असेही कासारवडवली पोलीसांनी सांगितले.