ठाण्यात श्वानाला जिवंत जाळले: दोन जुळया भावांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:59 PM2021-04-16T16:59:19+5:302021-04-16T17:00:04+5:30
ठाणे शहरातील राबोडी भागातील एका आजारी श्वानाला जिवंत जाळल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन जुळया भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरातील राबोडी भागातील एका आजारी श्वानाला जिवंत जाळल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन जुळया भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हे दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून हे श्वानाचे पिल्लू आजारी होते. त्याच्यावर एका प्राणी मित्र संघटनेकडून उपचारही सुरु होते. मात्र, बुधवारी रात्री त्याला कोणीतरी जाळल्याची माहिती राबोडी पोलिसांना दिली. त्याचवेळी सिटीझन्स फॉर अॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशनने याप्रकरणी अॅनिमल क्रुएलटी अॅक्ट आणि भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९ नुसार राबोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील हा श्वान आढळला. त्याला सिटीझन्स फॉर अॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशनच्या सदस्यांनी एका पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखलही केले. मात्र, त्याच दरम्यान त्याचा मृत्यु झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या पथकाने या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राबोडीतील मसनवाडा भागात याप्रकरणी चौकशी केली. तेंव्हा सात वर्षीय दोन अल्पवयीन जुळया मुलांनी या श्वानाला जाळल्याचे विदारक सत्य समोर आले. आता या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.