उल्हासनगरात कुत्रीला ठार मारलं, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 02:38 AM2022-05-30T02:38:38+5:302022-05-30T02:39:05+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ शिवगंगा पार्क इमारती मध्ये राहणाऱ्या दीपक मोतीरामानी यांनी चप्पला कुत्री पळवते या रागातून गुरवारी २६ मे रोजी कुत्रीला लाकडी बांबूंनी मारहाण केली.
सदानंद नाईक -
उल्हासनगर- कॅम्प नं-३ गुलराज टॉवर्स परिसरातील शिवगंगा पार्क इमारतीमध्ये राहणाऱ्या दीपक मोतीरामानी व हितेश मोतीरामानी या बापलेकांनी एका कुत्रीला लाकडी बांबूच्या सहाय्याने मारून ठार केले. याप्रकरणी त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स्थानिक नागरिकांनी कडक शिक्षेची मागणी केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ शिवगंगा पार्क इमारती मध्ये राहणाऱ्या दीपक मोतीरामानी यांनी चप्पला कुत्री पळवते या रागातून गुरवारी २६ मे रोजी कुत्रीला लाकडी बांबूंनी मारहाण केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांने कोणाचेही ऐकले नाही. मारहाणीत कुत्री जबर जखमी झाली. कुत्रीला ४ ते ५ लहान पिल्ले आहेत. शनिवारी दुपारी दीपक मोतीरामानी यांचा मुलगा रितेश याने त्याच कुत्रीला लाकडी बांबूने मारहाण केली. त्यावेळी आशिष सरकार याने कुत्रीला मारू नको म्हणून हटकले. तसेच जखमी पडलेल्या कुत्रीची पाहणी केली. मात्र दोन तासाने कुत्री निचपत पडल्याचे लक्षात आल्यावर आशिषसह इतर नागरिकांनी प्राण्यांच्या डॉक्टरला बोलाविले. डॉक्टरांनी तपासून कुत्री मेल्याचे सांगितले. याप्रकारने स्थानिक नागरिकांत असंतोष निर्माण झाला. त्यांनी कुत्रीचे शवविच्छेदन करून, त्याच्या अहवालावर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. तर आशिष सरकार यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दीपक व हितेश मोतीरामानी या बापलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात शहाड फाटक परिसरात एका रिक्षावाल्याने, कुत्र्याचे पिल्लू रिक्षात बसते, या रागातून कुत्र्याच्या पिलाला मारून टाकल्याची घटना घडली. याप्रकरणी प्राणीमित्राच्या तक्रारीवरून रिक्षा चालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकारने माणसातील माणुसपणा संपला की काय? असा प्रश्न निर्माण झाला. हिंसक झालेल्या नागरिकांवर उपचाराची गरज निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. कुत्रीवर आज अंत्यसंस्कार झाले असून तिच्या पिल्लाची देखभाल करण्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांनी दिले.