श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:51 AM2019-01-29T00:51:56+5:302019-01-29T00:52:23+5:30
पाच महिन्यांपासून प्रक्रिया थांबली; वाढीव खर्चाला स्थायीच्या मंजुरीची प्रतीक्षा, भटक्या कुत्र्यांची दहशत
ठाणे : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असतांना ऑगस्टपासून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थायी समितीमध्ये या संदर्भातील वाढीव खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, अद्यापही त्याला मंजुरी न मिळाल्याने ही प्रक्रिया थांबल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू शकते, अशी भितीही आता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, हा प्रस्ताव रोखला कोणी, त्या मागे नेमका काय हेतू आहे, याची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे.
ठाण्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या ही आजही कमी होतांना दिसत नाही. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २००४ पासून आतापर्यंत ५९ हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. परंतु, अद्यापही सुमारे १५ हजार भटक्या कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया बाकी असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मागील वर्षी एकाच महिन्यात त्यांनी १३०० जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु, शहरातील भटक्या कुत्र्यांचा कित्येक वर्षांपासूनचा सर्व्हे होणे अद्याप कागदावरच असल्याने शहरात आजघडीला नेमके किती कुत्रे आहेत, याचीच माहितीच आरोग्य विभागाला होऊ शकलेली नाही. सर्व्हे करण्यासाठीच्या प्रस्तावाला २०१५ मध्ये मंजुरी मिळालेली आहे. परंतु, अद्यापही तसा तो सुरू झालेला नाही. दरम्यान भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन वर्षासाठी दीड कोटींची तरतूद केली होती. परंतु, आॅगस्ट महिन्यापासून या शस्त्रक्रिया थांबल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
अद्यापही १५ हजाराहून अधिक कुत्र्यांवर शस्त्रक्रिया शिल्लक
पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरातील सुमारे १५ हजाराहून अधिक कुत्र्यांवर अद्यापही शस्त्रक्रिया होणे शिल्लक आहे. तरी प्रत्यक्षात पालिका हद्दीत सुमारे ७५ ते ८० हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. असे असतांना आता मागील पाच महिन्यापासून शस्त्रक्रियांची प्रक्रियाच थांबली असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान जी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. ती संपली असल्याने वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु,पाच महिने उलटूनही त्याला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. एकूणच आता हा प्रस्ताव रोखला कोणी, कशासाठी यामागची कारणे मात्र गुलदस्त्यात आहेत.
सर्वांचीच अळिमिळी गुपचिळी
स्थायी समितीच्या काही सदस्यांशी यासंदर्भात चर्चा केली असता, आळीमिळी गुपचीळीचीच भूमिका या सदस्यांनी घेतली आहे. तर महापालिकेच्या संबधीत विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले आहे.
ऑगस्टपर्यंत ३ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया
कुत्र्यांची जनन क्षमता लक्षात घेता अंदाजे प्रती महिना २५० ते ३०० कुत्र्यांवर प्रजनन प्रतिबंधक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यानुसार आॅगस्टपर्यंत तीन हजार भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.