श्वानांना लागला कर्मचाऱ्यांचा लळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:40 AM2019-06-15T00:40:32+5:302019-06-15T00:40:37+5:30
अॅनिमल वेल्फेअर : आजारी, अपघातात जखमी झालेल्यांवर केली जाते शस्त्रक्रिया
अंबरनाथ : शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा भटक्या कुत्र्यांवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अॅनिमल वेल्फेअर या संस्थेतर्फेनिर्बिजीकरण केले जाते. तसेच आजारी, अपघात झालेल्या कुत्र्यांवरही शस्त्रक्रिया केली जाते. अपघातात जखमी झालेल्या श्वानांना काळजी घेणाºया कर्मचाऱ्यांचा लळा लागला आहे.
अंबरनाथ येथील भाजी मंडईजवळील नगरपालिकेच्या अॅनिमल वेल्फेअर या संस्थेतर्फे शहरातील भटक्या, मोकाट तसेच अपघातात जखमी झालेल्या अशा श्वानांना संस्थेची टीम जाऊन पकडून आणते. त्यांच्यावर डॉ. राजेश सहारे शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांच्यावर औषधोपचार करण्याचे काम केले जाते. चार ते पाच महिन्यापूर्वी रेल्वेखाली येऊन अपघातात जखमी झालेला एक श्वानाला तेथे आणले होते. त्याच्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. त्या श्वानाला भूल देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करून त्या श्वानाचा एक पाय कापण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर तेथील विजय रणशूर यांनी आणि त्यांच्या पथकाने त्या श्वानाची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. यामुळे त्या श्वानाला तेथील लळा लागल्याने तो तेथून जाण्यास तयार नाही. अनेकवेळा त्या श्वानास नेऊन सोडण्यात आले, मात्र तो परत तेथेच येतो. त्यामुळे तो श्वान आता तेथेच राहत आहे. श्वानांसाठी दररोज १० किलो चिकन आणि आठ किलो भात, चार लिटर दूध इतका खुराक सकाळ, संध्याकाळ दिला जातो.
जिल्ह्यातील विविध शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकारही वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पालिका निर्बिजीकरण करत असले तरी शहरातील कुत्र्यांची दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.