नदीतून प्रवास... जव्हारमधील वृद्ध महिला रुग्णाला डोलीचा आसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:25 AM2022-07-25T10:25:58+5:302022-07-25T10:26:58+5:30
नदीतून प्रवास करत दवाखान्यात भरती करण्याची आली वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासींना आजही पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील एका वृद्ध महिलेला रुग्णालयात नेताना रस्त्याअभावी लाकडी डोलीचा आधार घेऊन नदी पार करीत रुग्णालयात भरती करण्याची वेळ शुक्रवारी आली. ही बाब नवीन नसून जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील काही अतिदुर्गम गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.
भाटीपाडा गावात राहणाऱ्या लक्ष्मी लक्ष्मण घाटाल (वय ६२) या वृद्ध महिलेच्या पायाला मोठी जखम झाल्याने त्यांचा पाय सुजला होता. वेदना असह्य झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यायचा निर्णय घेतला. मात्र, तिथे नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
३ किलोमीटर अंतर केले चालत पार
n रस्ता नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी डोली बनविली व काळशेती नदीच्या पात्रातून जवळपास १०० मीटर अंतर पार करून मुख्य रस्ता येईपर्यंत ३ किलोमीटर अंतर चालत डोंगरदऱ्या व जंगलातून वाट काढीत रुग्ण महिलेस जव्हार रुग्णालयात दाखल केले.
n ही बाब बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांना समजताच त्यांनी रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी तातडीने मदत उपलब्ध करून दिली.
निधी उपलब्ध झाल्यास होऊ शकेल रस्ता
या गावात रस्ता व्हावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून दरोडा हे पाठपुरावा करत आहेत, परंतु अजूनही रस्ता बनविण्यासाठी निधी मिळाला नाही. ही जागा वन विभागात असल्याचे कारण देण्यात येत होते, परंतु आता वनविभागाच्या ३ (२) चा प्रस्ताव मंजूर झाला असून, निधी उपलब्ध झाल्यास हा रस्ता होऊ शकेल, असे दरोडा यांनी सांगितले. यावेळी झाप ग्रामपंचायत माजी उपसरपंच तुकाराम गरेल, चंद्रकांत वाढू, जगन खानझोडे, लक्ष्मण खानझोडे, विलास बागुल व भाटीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.