उल्हासनगरातील डॉल्फिन रस्त्याचे काम २ वर्षानंतरही अर्धवट, अपघाताची शक्यता
By सदानंद नाईक | Published: July 6, 2024 05:04 PM2024-07-06T17:04:20+5:302024-07-06T17:04:40+5:30
उल्हासगरातील शांतीनगर प्रवेशद्वार ते सी ब्लॉक डॉल्फिन रस्ता एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्ते बांधण्यात येत असून त्यामध्ये डॉल्फिन रस्त्याचा समावेश आहे.
उल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या डॉल्फिन रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या दुरावस्थामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
उल्हासगरातील शांतीनगर प्रवेशद्वार ते सी ब्लॉक डॉल्फिन रस्ता एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्ते बांधण्यात येत असून त्यामध्ये डॉल्फिन रस्त्याचा समावेश आहे. डॉल्फिन रस्त्या शेजारील संच्युरी मैदानावर विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी २ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते डॉल्फिन रस्त्याचे भूमिपूजन झाले होते. मात्र २ वर्षानंतरही रस्ता पूर्ण झाला नाही. या पावसाळ्यात रस्ता बांधून पूर्ण होणार असे बोलले जात असतांना, रस्ता अर्धवट बांधल्याने, रस्त्याची दुरावस्था होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होत आहे. रस्त्यावरून जाणारे मोटरसायकलस्वार दररोज पडून जखमी होत असल्याचे, स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिका बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार उपअभियंत्याला डावलून कनिष्ठ अभियंताकडे दिल्याने, विभागात गोंधळ उडाल्याची टीका होत आहे. तशीच टीका पाणी पुरवठा विभागावर होत आहे. विभागा अंतर्गत ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना याशिवाय इतर २५ ते ३० कोटींची इतर विकास कामे सुरू आहे. मात्र विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार उपअभियंत्याला डावलून कनिष्ठ अभियंताकडे दिला आहे. शासनाने वेळीच प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिली असतीतर बांधकाम व पाणी पुरवठा विभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली नसती. असे मत नागरिकांकडून होत आहे.
पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण....संदीप जाधव (उपअभियंता-उल्हासनगर महापालिका) शहरात एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. पावसाळ्यात रस्त्याची तात्पुरती दुरुस्तीचे काम सुरू आहे.