Dombivali: डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या १९७४ च्या दहावीच्या बँचची तब्बल ५० वर्षांनी भेट

By अनिकेत घमंडी | Published: February 9, 2024 11:02 AM2024-02-09T11:02:03+5:302024-02-09T11:02:13+5:30

Dombivali News: मनामधे खूप सारी उत्सुकता , कुतूहल ,  १६-१७ वर्षाच्या वयात  ज्यांचा व्यथित अंत:करणानी निरोप घेतला होता ; त्यांना भेटण्याची ओढ अश्या अनिवार भावना घेऊन आम्ही सगळे , जवळपास ५० जण २९-३० जानेवारीला पुण्याजवळच्या पामवुड्स रिसॉर्ट वर भेटलो .

Dombivali: 1974 class 10th batch of Dombivali's Tilaknagar School meets after 50 years | Dombivali: डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या १९७४ च्या दहावीच्या बँचची तब्बल ५० वर्षांनी भेट

Dombivali: डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या १९७४ च्या दहावीच्या बँचची तब्बल ५० वर्षांनी भेट

- अनिकेत घमंडी 
डोंबिवली - मनामधे खूप सारी उत्सुकता , कुतूहल ,  १६-१७ वर्षाच्या वयात  ज्यांचा व्यथित अंत:करणानी निरोप घेतला होता ; त्यांना भेटण्याची ओढ अश्या अनिवार भावना घेऊन आम्ही सगळे , जवळपास ५० जण २९-३० जानेवारीला पुण्याजवळच्या पामवुड्स रिसॉर्ट वर भेटलो . वेगवेगळ्या गावांवरुन कुणी बस करुन कुणी स्वत:च्या गाड्यांनी कुणी , ओला , उबर , ट्रेन वगैरेनी तिथे पोचलो . निमित्त होतं दहावीच्या बॅचला ५० वर्ष पूर्ण झाल्याचं. त्यासाठी डोंबिवलीच्या   ‘ टिळकनगर विद्यामंदिर  ‘ शाळेचे १९७४ च्या बॅचचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने , मोठ्या संख्येने जमले होते.

तेथे पोचल्यावर आनंदाचा सुखद अनुभव आला . सगळ्यांचं स्वागत औक्षण करुन , फुलं गजरे देऊन करण्यात आलं . प्रत्येकाच्या मनगटावर घालून सगळ्यांचे मैत्रीचे बंध घट्ट करण्यात आले . तिळगुळ देऊन तोंड व हा प्रसंग गोड करण्यात आला . मग एकच गडबड उडाली . सगळ्यांना सगळ्यांशी भेटायची घाई होऊन गेली . कोण कुठे असतात , काय करतात ?  मुलंबाळं कुटुंबाची चौकशी सुरू झाली.  ५० वर्षाचं साठलेलं कुतुहल शमवून आपल्या जुन्याच मित्रमैत्रिणींशी नव्याने ओळख झाली. कुणी पटकन ओळखू आले तर कुणाला ओळख द्यावी लागली. ह्या भेटीगाठीच्या सुखद सोहळ्यात सगळ्यांची तहानभूक हरपली होती , पण जेवणाच्या खमंग वासाने पावलं तिकडे वळली व  काळजीपूर्वक ठरवलेल्या वैविध्यपूर्ण , अतिशय चविष्ट जेवणाचा आस्वाद मित्रमैत्रीणींच्या साथीनी अजूनच रुचकर झाला . 

मित्रमैत्रिणींच्या साथीबरोबरच साथ होती निसर्गाची . अतिशय नयनरम्य अशा या रिसाॅर्टमधे जेवणाची व्यवस्था नदीच्या किनारी केली होती . झुळझुळ वाहणारी नदी , पलिकडच्या तीरावरची हिरवाई , दाट झाडी ..अलिकडे सुबक रितीनी मांडलेले टेबल्स आणि स्वादिष्ट जेवण . पोट आणि मन तुडुंब भरुन गेले . सगळा रिसॉर्टच खूप सुंदर आहे . दुतर्फा नारळाच्या झाडांची रांग असलेले आखीव रेखीव रस्ते , नीट राखलेले लाॅन्स , फुलझाडं , टुमदार  कौलारू , सर्व सोयींनी सुसज्ज असे बैठे बंगले आणि नदीच्या बाजूने जाणारा सुंदर कठड्यानी नदीपासून विभागलेला , दाट झाडांनी वेढलेला रस्ता  . आणि उरलेल्या जागेत पसरलेली हिरवीगार शेतं . अतिशय छान ठिकाण . तसंच बैलगाडी , घोड्याची सवारी , नेमबाजी , सायकलिंग वगैरे आकर्षणं होतीच . सगळ्यांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला  आणि मग संध्याकाळच्या आल्हाददायक हवेत , सुखद गारव्यात सुरू झाला मित्रमैत्रिणींच्या विविध कलादर्शनाचा कार्यक्रम . शाळेत गॅदरिंगमधे चमकलेले लोक तर होतेच पण काही छुपे रुस्तम पण होते . गाणी , नकला ,  काव्यवाचन , मनोगतं , मजेशीर उखाणे , विडंबनं , डान्स यांनी अगदी बहार उडवून दिली . रात्री बारा , साडेबारा वाजेपर्यंत उत्तरोत्तर रंगतच गेला कार्यक्रम . 

दिवस संपला पण मन भरलं नव्हतं . दुसऱ्या दिवशीचे वेध लागले होते . तो इथल्या वास्तव्याचा शेवटचा दिवस . तो जास्तीत जास्त कारणी लावायची प्रत्येकाची इच्छा होती . मग गप्पागोष्टींमधे चहा नाश्ता , घोळक्या घोळक्यानी रिसाॅर्टचा फेरफटका , हास्यविनोदात मजेत वेळ घालवून मंडळी परतली आणि सुरू झाला मजेदार गेम्सचा सिलसिला . हसत खेळत , गंमतीशीर खोडकर मिश्किल काॅमेंट्स करत धमाल आली . आणि आतापर्यंत आनंदात , मजेत घालवलेला वेळ संपत आला . एका ओढीनी मित्रमैत्रीणी एकमेकांना भेटले होते  . एकमेकांबरोबर प्रेमाने , आनंदाने वेळ घालवला होता . आजी आजोबा झालेले सगळे परत शाळेच्या वयात जाऊन दंगामस्तीत रमून गेले होते . इतक्या वर्षांचं अंतर पुसून एकमेकांमधे मिसळून गेले होते .

पण जेवणा नंतर निरोपाची वेळ आलीच . ती वेळ कठीण असते पण पुन्हा लवकरच भेटण्याची , एकत्र जमण्याची आश्वासनं देऊन आणि तोपर्यंत पुरेल इतकी आनंदाची , प्रेमाची , समाधानाची शिदोरी घेऊन , एक उर्जा घेऊन प्रत्येक जण घरी परतला . फोटोंमधे त्यांनी एकमेकांना आणि आठवणींना साठवून ठेवलं होतंच .

ही सगळी ट्रीप आनंदात , सुरळीत पार पडावी म्हणून आमच्यातलेच आठजण आठदहा महिन्यांपासूनच कामाला लागले होते . तारीख , ठिकाण ठरवण्यापासून लोकांची येण्याजाण्याची व्यवस्था , जेवण नाश्त्याचे मेनू  , रहाण्याची सोय , कार्यक्रमाची रूपरेषा , गेम्सचं नियोजन वगैरे वगैरे पर्यंत अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करुन केलेल्या त्यांच्या चोख आयोजनामुळे हे गेटटुगेदर , सगळ्यांचं वास्तव्य आनंददायी झालं व सगळे समाधानाने , पुढच्या भेटीची उत्कंठा घेऊन घरी परतले . 
या संमेलनाच्या आठवणी दिर्घकाळ मनात रेंगाळत रहातील अशा भावना कोणाचेही नाव टाकू नका असे सांगून ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी हसतमुखाने घरी परतले.

Web Title: Dombivali: 1974 class 10th batch of Dombivali's Tilaknagar School meets after 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.